Viral Video : वर्षानुवर्षे चालणारी महाराष्ट्राची वारीची परंपरा आपल्या सर्वांना माहिती आहे. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरला जातात. यंदा आषाढी एकादशी ही २९ जूनला आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. वारीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क विदेशी पाहुणे हरिनामात दंग झालेले दिसत आहे.
या व्हिडीओत काही विदेशी पाहुणे फुगडी खेळताना दिसत आहेत तर काही विदेशी पाहुणे हरिनामाचे भजनगीत टाळ-मृदुंगात वाजवताना दिसत आहे. काही पाहुणे डोक्यावर तुळस घेऊन वारीत सहभागी झालेले दिसत आहेत तर काही पाहुणे भजनाच्या तालावर ठेका धरताना दिसत आहेत. हा सुंदर व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाणार आहात. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
warkari_pandharicha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सुप्रसिद्ध अशा ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये ‘हे विश्वचि माझे घर’ ही संकल्पना मांडली आहे. खरे तर संपूर्ण विश्वाला कवेत घेऊ पाहणारी ही संकल्पना आहे.
भारतामध्ये संपूर्ण विश्व हे आपल्या घरासारखे आहे आणि विश्वातील सर्व प्राणिमात्र हे आपले बांधव आहेत, ही भावना फार प्राचीन काळापासून रुजलेली आहे.”
या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाइक्स आले असून अनेक युजर्सनी ‘रामकृष्ण हरी,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिले आहे, ‘अशी जपली पाहिजे आपली संस्कृती, जय हरी!’ तर आणखी एका युजरने लिहिले आहे, ‘अशी आहे पांडुरंगाची लीला!’