विठ्ठल-रखुमाईचं नामस्मरण करत, अभंग-भजन गात, टाळ-मृदंग वाजवत वारक-यांची पावले पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पंढरीच्या या वारीचं आकर्षण अवघ्या महाराष्ट्राला आहे. ३५० वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा आजतागायत चालू आहे. या मागे परंपरेने चालत आलेली श्रद्धा आणि पाडुंरंगाला भेटण्याची आस याच गोष्टी असतात. हीच महाराष्ट्रातील कित्येक वर्षाची वारीची परंपरा आता सातासमुद्राच्या पलीकडे नव्या स्वरूपात रुजू पहातेय. देशाबाहेर पहिल्यांदाच अमेरिकेत वारीचा उत्साह पाहायला मिळाला. ही सातासमुद्रापार अमेरिकेतील वारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भारताबाहेर पहिल्यांदाच अमेरिकेतील वारी घडली आहे. महाराष्ट्र मंडळ बे एरिया, कॅलिफोर्निया आयोजित ही वारी होती. डोईवर तुळस, मुखी माऊलीचे नाव, गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळी बुक्का, कानाच्या दोन्ही पाळ्यांना गोपीचंदन, खाद्यांवर पताका आणि हातात टाळ-मृदंग अशा वेशात अमेरीकेत भारतीय वारकरी वारीत तल्लीन झाले आहेत. या व्हिडीओत काही विदेशी फुगडी खेळताना दिसत आहेत तर काही विदेशी हरिनामाचे भजनगीत टाळ-मृदुंगात वाजवताना दिसत आहे. काही डोक्यावर तुळस घेऊन वारीत सहभागी झालेले दिसत आहेत तर काही भजनाच्या तालावर ठेका धरताना दिसत आहेत. वारीच्या निमित्ताने या परदेशातील महाराष्ट्रीयन माणसांची उजळणी झाली.
पाहा व्हिडीओ
अमेरीकेत घडवून आणलेल्या वारीचा व्हिडीओ पाहून अनेककांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे, तर अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना समाधान व्यक्त केलं आहे.