सर्वाधिक चर्चेत असलेली अडल्ट स्टार म्हणून ओळखी जाणारी मिया खलिफा हिने नुकतीच ‘बीबीसी’ला एक मुलाखत दिली. यामध्ये तिने अगदी वयाच्या २१ व्या वर्षी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये येण्याचा निर्णय घेण्यापासून ते क्षेत्र सोडण्यापर्यंतचा प्रवास आणि त्या दरम्यान आलेले अनुभव सांगितले. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर घरच्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती याबद्दल बोलताना मियाने बरेच खुलासे केले.
२०१४-१५ दरम्यान मियाने तीन महिन्यांसाठी पॉर्न इंडस्ट्रीत काम केलं होतं. तीन महिन्यांच्या या कारकिर्दीमुळे आयुष्यभरासाठी आपल्यावर पॉर्नस्टार असल्याचा ठपका बसल्याची खंत तिने या मुलाखतीमध्ये बोलून दाखवली. ‘ज्यावेळी तू या इंडस्ट्रीत आल्याचं तुझ्या घरच्यांना समजलं तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती?’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना मिया भावूक झाल्याचे दिसले. ‘मी जेव्हा पॉर्नस्टार म्हणून काम करत असल्याचे माझ्या घरच्यांना समजले तेव्हा त्यांनी माझ्याशी असलेले सर्व संबंध तोडले. मी लेबननमधील आहे. तो देश तेथील धार्मिक विचारांमुळे कट्टरतावादी आहे. अशा देशातून आलेली असताना मी जाणते अजाणतेपणी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. त्यातही माझे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या,’ असं मियाने मुलाखतीमध्ये सांगितले.
‘मी वयाच्या २१ व्या वर्षी या क्षेत्रात आले. त्यावेळी हे व्हिडीओ इतके लोकप्रिय होतील असं मला वाटलं नव्हतं. हे माझं एक डर्टी सिक्रेट असेल असं मला वाटलेलं. कारण या क्षेत्रात अनेक तरुणी काम करतात पण प्रत्येकीला लोकं ओळखत नाहीत. दुर्देवाने माझ्याबद्दल तसे झाले नाही. आज ते क्षेत्र सोडून मला चार वर्षांहून अधिक काळ झाला आहे. तरी लोकं मला पॉर्नस्टार म्हणूनच ओळखतात. माझ्या घरच्यांनी माझ्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क ठेवलेले नाही,’ अशी खंत मियाने बोलून दाखवली.
‘पॉर्न इंडस्ट्री आणि त्यानंतर त्यामधून बाहेर पडण्यासाठी मी करत असलेली धडपड यादरम्यान अनेक वेळा असे प्रसंग आले जेव्हा माझ्याबरोबर कोणीच नव्हते. मी एकटीने या सर्व प्रसंगांना तोंड दिले. माझा कोणताही मॅनेजर नाही किंवा वकील नाही. अनेक प्रकरणांमध्ये मला कायदेशीर सल्ला देण्यासाठीही कोणी नव्हते. मला एकटेपणाचा अनेकदा त्रास झाला,’ असं मियाने या मुलाखतीमध्ये सांगितले. ‘मात्र आता मला समजून घेणारा आणि मला सोबत करणारा जोडीदार सापडला आहे,’ असंही तिने मुलाखतीच्या शेवटी हसत सांगितले. मात्र तिने आपल्या या जोडीदाराचे नाव सांगितले नाही.
पॉर्न इंडस्ट्रीमुळे खासगी आयुष्याचे वाटोळे झाल्याची खंत मियाने या मुलाखतीत व्यक्त केली.