Boris Johnson: ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे उत्तम राजकारणी आहेत. २०१९ मध्ये त्यांनी ब्रिटीश पंतप्रधान म्हणून पदभार सांभाळायला सुरुवात केली होती. त्याआधी २०१६ ते २०१८ या काळात परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. २०२२ मध्ये त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले. मागील अनेक वर्षांपासून बोरिस जॉन्सन हे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रीय आहेत. राजकारणामध्ये येण्यापूर्वी त्यांनी पत्रकार म्हणून काम केले. ब्रिटनचे पंतप्रधान बनल्यापासून बोरिस जॉन्सन सतत चर्चत होते. सध्या कामांसह त्यांच्या खासगी आयुष्याविषयीच्या चर्चा उधाण आलं आहे.
बोरिस जॉन्सन आणि त्यांची पत्नी कॅरी जॉन्सन यांना तिसऱ्यांदा अपत्यप्राप्ती होणार आहे. मे २०२१ मध्ये त्यांनी विवाहसोहळा संपन्न झाला होता. बोरिस आणि कॅरी यांच्या थोरल्या मुलाचे नाव विल्फ आणि धाकट्या मुलीचे नाव रोमी असे आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी बोरिस जॉन्सन पुन्हा एकदा बाबा बनणार आहेत. त्यांची पत्नी कॅरी जॉन्सन यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत ही बातमी दिली. यापैकी पहिल्या फोटोमध्ये त्या विल्फ आणि रोमी यांचा हात पकडून रस्त्यावरुन चालत असल्याचे पाहायला मिळते. दुसऱ्या फोटोमध्ये रोमीने त्यांच्या पोटावर चिमुकला हात ठेवल्याचे दिसते. या फोटोंना त्यांनी ‘काही आठवड्यांमध्ये नव्या टीम मेबरचे आगमन होणार आहे. मागील आठ महिन्यांपासून मी थोडी थकले आहे. पण आम्ही लहान पाहुण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.’ असे कॅप्शन दिले आहे.
जन्माला येणारं बाळ हे बोरिस यांचं आठवं अपत्य असणार आहे. बोरिस व त्यांची पूर्वपत्नी मरिना व्हीलर यांना चार मूलं आहेत. कला सल्लागार हेलन मॅकिन्टायर यांच्याशी बोरिस यांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधांमधून २००९ मध्ये एका मुलाचा जन्म झाला. त्यानंतर त्यांची पत्नी कॅरी यांनी विल्फ आणि रोमी यांना जन्म दिला. बाळाच्या येणाच्या बातमीमुळे बोरिस जॉन्सन यांच्या नावाची चर्चा सर्वत्र होत आहे.