जेव्हा जेव्हा कर्नाटकची राजधानी बंगळुरूचा उल्लेख होतो, तेव्हा तेथील आयटी क्षेत्र, ट्रॅफिक इत्यादींबद्दलही चर्चा होते. अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये बंगळुरूमध्ये आहेत आणि त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारीही बंगळुरूमध्ये राहतात. अशात बंगळुरूमधून एक वेगळीच घटना समोर आली आहे, ज्यात एक गुगलचा माजी कर्मचारी सध्या बंगळुरूमध्ये चक्क उबर टॅक्सी चालकाचे काम करत असल्याचे समोर आले आहे. ट्विटरवर एका युजरने गुगलचा माजी कर्मचाऱ्यावर असे काम करण्याची वेळ का आली याविषयी सांगितले आहे. ही पोस्ट आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राघव दुवा नावाच्या एका युजरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, माझा उबेर मोटो ड्रायव्हर, जो गुगलचा माजी कर्मचारी आहे, फक्त २० दिवसांपूर्वी तो हैदराबादहून बंगळुरूला शिफ्ट झाला होता. असे दिसतेय की, तो शहराबद्दल जाणून घेण्यासाठी हे काम करत आहे. सध्या राघवची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप पाहिली जात आहे.
अनेकांना नवीन मित्र बनवताना नवीन शहर शोधण्याची आणि बाईक टॅक्सी रायडर म्हणून पैसे कमावण्याची ही कल्पना अनोखी आणि मनोरंजक वाटत आहे. केवळ पैसे खर्च करून आणि ट्रॅव्हल ब्लॉगर्सच्या सल्ल्यानुसार फिरण्याऐवजी तुम्ही तेथील मुख्य शहरांची आणि लपलेल्या ठिकाणांची ओळख करून पैसे कमावण्याची ही पद्धत अनेकांना आवडली आहे.
यामुळे या व्हिडीओवर आता लोक विविध कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, मी विशाखापट्टणममधील ५३ वर्षीय एका माजी बँक व्यवस्थापकास भेटलो, जो नवनवीन लोकांना भेटण्यासाठी, नवीन शहर एक्सप्लोर करण्यासाठी रॅपिडो चालवत आहे.