अंकिता देशकर
Four Month Baby Fell In Drainage: बुधवारी सकाळी सुरु झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह लगतच्या भागांना झोडपून काढले आहे. ट्रेनची गर्दी, लोकल ट्रेन रद्द झाल्याने प्रवाशांची दैना याचे अनेक फोटो व्हिडीओ कालपासून सातत्याने समोर येत आहेत. कित्येकजण रेल्वे रुळावरून चालत निघालेले असताना या फोटोंमध्ये दिसत आहेत, अशाच एका रूळातून चालत निघालेल्या आईवर कालच्या पावसात दुःखाचा डोंगर कोसळला. मुसळधार पावसामुळे ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली असताना, चार महिन्यांच्या मुलाला घेऊन रूळातून चालत असताना हे बाळ हातातून निसटून नाल्यात वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना काल घडली. याही घटनेचा व्हायरल व्हिडीओ समोर येताच महाराष्ट्र त्या माउली बरोबर शोक करू लागला.
याच पार्श्वभूमीवर लाईटहाउस जर्नालिज्मला काही अशा पोस्ट सापडल्या, ज्यात हे बाळ एनडीआरएफच्या टीमला सुखरूप सापडले असल्याचा दावा करण्यात आला होता. काही न्यूज साईट्सवर सुद्धा हा दावा वाचून अनेकांना आनंद झाला होता. पण आता याप्रकरणार वेगळेच सत्य समोर येत आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर ‘महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना’ ने व्हायरल पोस्ट ट्विटर वर शेअर केली.
इतर यूजर्स देखील हा दावा शेअर करत आहेत.
एका मराठी न्यूज वेबसाइटनेही हा व्हायरल दावा शेअर केला असल्याने अधिकच गोंधळ निर्माण झाला होता.
तपास:
तपासाच्या पहिल्या टप्प्यात आम्ही त्यासंबंधीच्या बातम्या तपासल्या. दुर्दैवाने आम्हाला यासंदर्भात केवळ बाळ नाल्यात पडून वाहून गेल्याच्याच बातम्या आढळून आल्या व कुठल्याही बातमीत बाळ सापडल्याचा दावा करण्यात आला नव्हता.
या बातमीचे वृत्तांकन करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराशी संपर्क केला असता, बाळाचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाह जोरदार होता त्यामुळे बाळाचा शोध घेणे कठीण झाले असले तरी एनडीआरएफचे पथक काल संध्याकाळपासून अथक परिश्रम घेत आहे.
तपासाच्या पुढील टप्प्यात आम्ही कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्याशी संपर्क साधला. बाळ जिवंत असल्याच्या व्हायरल बातम्या खोट्या असल्याचं त्यांनी सांगितलं. NDRF टीम अजूनही बाळाच्या शोधासाठी अथक परिश्रम करत आहे, असे त्यांनीही सांगितले.
निष्कर्ष: नाल्यात वाहून गेलेल्या चार महिन्यांच्या बाळाच्या जिवंत असल्याबद्दलच्या व्हायरल पोस्ट खोट्या आहेत. एनडीआरएफची शोधमोहीम अजूनही सुरू आहे.