पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानासाठी अनेकांनी योगदान द्यायला सुरूवात केली. विविध मोहिम राबवरून शहरापांसून ते खेड्यापाड्यांतील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. गावात रोगराई पसरू नये यासाठी हागणदारी मुक्त मोहिम राबवली जात आहे. पण आजही देशात अशी काही गावे आहेत जी अजूनही हागणदारी मुक्त झाली नाहीत. काही गावात आजही शौचालये नाहीत. घरात शौचालय नसलेल्या आपल्या मित्राला शौचालय बांधून देणा-या चार मित्रांचे सध्या खुप कौतुक होत आहे. तामिळनाडूतल्या थेटाकुडी या गावातील सरकारी शाळेत शिकणा-या मुलांनी हे चांगले काम केले. ही चारही मुले आठवती शिकतात. त्यांचा एक वर्गमित्र गरीब कुटुंबातून येतो. त्यामुळे त्यांच्या घरात स्वच्छतेच्या प्राथमिक सुविधाही उपलब्ध नाही. घरात शौचालय नसल्याने या कुटुंबाला बाहेर जावे लागते. त्यामुळे हा मुलगा सतत आजारी पडतो, शाळेतही त्यांची उपस्थिती कमी असते, तसेच त्याला त्वचेचे रोगही झाल्याचे या मुलांना समजले, तेव्हा आपल्या मित्राला मदत करण्यासाठी या मुलांनी त्याच्या घरात शौचालय बांधायचे ठरवले. यासाठी त्यांना त्यांच्या शिक्षकांनी देखील प्रेरणा दिली. स्वांतत्र्यदिना दिवशी काढण्यात आलेल्या रॅलीमधून जे काही पैसे जमा झाले त्यातून या मुलांनी स्वत:च्या हाताने शौचालय बांधले. राहुल, वसीगरन, नवीनराज आणि हरिष अशी या चार मुलांची नावे आहेत.