Law For Cock To Crow : प्राण्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले वन्यप्राणीप्रेमी तुम्ही अनेकदा पाहिले असतील, तसेच मांसाहाराविरोधात आणि प्राण्यांना कैद करून ठेवण्यास विरोध करणारेही तुम्ही पाहिले असतील. प्राण्यांच्या ओरडण्याचा मुद्दा थेट संसदेत नेणारे सरकार तुम्ही फार क्वचितच कुठे पाहिले असेल. आज आपण अशाच एका देशातील सरकारबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी कोंबड्यांसाठी खास कायदा तयार केला आहे.
सध्या युरोपिय देश फ्रान्सचे सरकार कोंबड्यांसाठी तयार केलेल्या खास कायद्यामुळे चर्चेत आहे. तुम्ही आजपर्यंत अनेक विचित्र कायद्यांबद्दल ऐकले असेल, परंतु फ्रान्समध्ये ज्या नवीन कायद्याची चर्चा सुरू आहे, तो कायदा खास कोंबड्यांसाठी तयार केला याहे. या कायद्यानुसार, कोंबड्यांना कितीही मोठ्या आवाजात आरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
फ्रान्स सरकार कोंबड्यांच्या बाजूने उभे राहिले आहे, त्यामुळे पहाटे कितीही वाजता कितीही जोरात कोंबडा आरवला तरी कोणीही त्या विरोधात तक्रार करू शकत नाही. याबाबत कोणी तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर ती तक्रार व्यर्थ समजली जाणार आहे.
कोंबड्याला मोठ्याने आरवण्याचा कायदेशीर अधिकार
फ्रान्समध्ये अनेक लोक शहरातील धावपळ आणि गजबजाटापासून काहीवेळ दूर राहण्यासाठी सुट्ट्यांमध्ये सहसा खेड्यापाड्यात वेकेशन हाऊस बनवून राहतात. शांतता अनुभवण्यासाठी ते या ठिकाणी येऊन राहतात. पण, गाव आहे तिथे शेतकरी आणि त्यांची जनावरेही असणारच. यामुळे समस्या अशी होती की, पहाटे कोंबड्यांचे आरवणे आणि कुत्र्यांचे भुंकणे यामुळे शहरापासून दूर खेड्यात आलेल्या शहरी लोकांना खूप त्रासदायक वाटायचे. अनेकदा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचायचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फ्रेंच न्यायालयांत अशी शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत, ज्यात कोंबड्यांच्या आरवण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु, फ्रान्स सरकारने या मागणीला कडाडून विरोध करत, आता कोंबडा गळा फाडून आरवला तरी त्याचे कोणी काही करू शकत नाही, असा कायदाच आणला आहे.
कोंबड्यांच्या हक्कासाठी विशेष कायदा
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या कायद्याला पाठिंबा दिला आणि तो सिनेटपर्यंत पोहोचला. याबाबत कायदे मंत्र्यांनी एक एक्स पोस्ट करत लिहिले की, या कायद्यामुळे शेतकऱ्यांवरील कायदेशीर खटले संपतील, ते फक्त त्यांचे काम करतात, जेणेकरून आपण अन्न खाऊ शकू. कॉमन सेंसची गोष्ट आहे. या कायद्यानंतर शेजारच्या जनावरांचा आवाज, शेतीच्या उपकरणांचा आवाज, घाण, दुर्गंधी अशा गोष्टींबाबत तक्रार करणे सोपे जाणार नाही.