Frog Found in Wafers video viral : तुम्ही खाण्यासाठी वेफर्सचं पाकीट घेतलं. टीव्हीचा आनंद घेत मजेत तुम्ही हे वेफर्स खात आहात. पण, तेवढ्यात पाकिटात तुम्हाला एक मेलेला बेडूक सापडला, तोदेखील वेफर्ससोबत तळलेला; तर तुम्ही काय कराल? कल्पनादेखील करवत नाही ना? पण होय, अशी एक घटना समोर आली आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये एका तरुणाला वेफर्सच्या पाकिटात बेडूक सापडला, यामुळे सध्या संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. याचा किळसवाणा व्हिडीओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गुजरातमधील जामनगरमध्ये बालाजी वेफर्सच्या बटाटा चिप्सच्या पॅकेटमध्ये मृत बेडूक आढळून आल्याची माहिती आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाची माहिती मिळताच जामनगर महापालिकेने बुधवारी चौकशीचे आदेश दिले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या बालाजी वेफर्सच्या पॅकेटमध्ये चिप्समध्ये मेलेला बेडूक दिसत आहे. अतिशय किळसवाणं हे दृश्य पाहून तुम्हीही वेफर्स खाताना दहावेळा विचार कराल.
वेफर्सच्या पाकिटात आढळला सडलेला बेडूक
या प्रकरणाबाबत जामनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तपासाचा भाग म्हणून बटाटा चिप्स पॅकेटच्या उत्पादन बॅचचे नमुने गोळा केले जातील. अन्न सुरक्षा अधिकारी डी. बी. परमार यांनी सांगितले की, जास्मिन पटेल नावाच्या एका तरुणीने त्यांना बालाजी वेफर्सच्या पॅकेटमध्ये मृत बेडूक आढळल्याची माहिती दिली. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी, काल रात्री ते पॅकेट ज्या दुकानातून खरेदी केले होते त्या दुकानात गेले. सुरुवातीच्या तपासात तो मृत बेडूक असल्याचे समोर आले असून, तो कुजलेल्या अवस्थेत होता. आता महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार या बटाटा चिप्स पॅकेटचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत.
पाहा व्हिडीओ
नुकतेच मुंबईतील एका रहिवाशाने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला होता. त्यानंतर आता ऑनलाइन ऑर्डर केलेल्या चॉकलेट सिरपमध्ये मृत उंदीर आढळून आला. ही दोन्ही प्रकरणे अद्याप थंडावली नव्हती, तर आता गुजरातमधील जामनगरमध्ये अशीच घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
एखाद्या पदार्थामध्ये पाल, बेडूक सापडल्याची ही पहिला घटना नाही. याआधीसुद्धा अशी बरीच प्रकरणं समोर आली आहेत. महाराष्ट्रातही अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत.