खाद्यपदार्थांचे, विविध रेसिपींचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर असतात. त्यामध्ये कधी घरगुती पदार्थ पाहायला मिळतात, तर कधी कुठल्या हॉटेल किंवा अगदी रस्त्यावर मिळणाऱ्या पदार्थांची माहिती आपण बघत असतो. अशात काही मंडळी स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या मदतीने अशा काही पदार्थांचा शोध लावत असतात की ते बघून, व्हिडीओ पाहणाऱ्यांचे तोंड अगदी बघण्यासारखे होते. असंच काहीसं सोशल मीडियावर फिरणाऱ्या, तळलेल्या न्यूटेला पोळी-भाजीचा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच गोंधळात पडलेले दिसत आहेत.
खरं तर न्यूटेला आणि पोळी एकत्र खाण्यात काहीच वेगळेपण किंवा विचित्रपणा नाहीये. मात्र, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @bhookkad_beast नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मात्र हा पदार्थ विकणाऱ्याने पोळी, न्यूटेला आणि भाजी यांसोबत जे केले आहे, ते पाहून नेटकरी फारच गोंधळून गेलेत. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती पोळी लाटून घेतो आणि त्यामध्ये एक चमचा [थोडे जास्त] पूर्ण भरून घेतलेले न्यूटेला घालून ती पोळी, करंजी बंद करावी तशी बंद करून तेलामध्ये खरपूस तळून काढतो. इथपर्यंत सर्व ठीक होतं, मात्र त्याने तळलेला तो पदार्थ चक्क ग्रेव्ही भाज्या, डाळ आणि चटणीसोबत खाण्यासाठी दिला असल्याचे आपण पाहू शकतो.
हेही वाचा : पाटणाची सुप्रसिद्ध ‘धोबीपछाड इमरती’; ‘या’ व्हायरल व्हिडीओमधील स्वच्छता बघून डोक्याला लावाल हात!
आता हे सर्व पाहताच अनेकांना हे करण्यामागचे कारण, उद्देश समजत नव्हता. तर काही नेटकऱ्यांना संपूर्ण पदार्थाची एकूण प्रक्रियाच विचित्र वाटली. नेटकऱ्यांनी या न्यूटेला थाळीवर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहा.
एकाने, “म्हणजे सुरुवातीला आपण नुसत्या भाज्या खायच्या आणि शेवटी गोड म्हणून ही न्यूटेला पोळी खायची, असं आहे का?”, असे विचारले. दुसऱ्याने “आता याला पौष्टिक म्हणावं की नाही हा प्रश्न पडलाय”, असे म्हटले आहे. तिसऱ्याने, “ज्यांना हा पदार्थ आवडलाय, त्यांच्यासाठी पाताळात विशेष जागा आहे”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. “भारतीय पद्धतीचे क्रॉसॉन्ट [फ्रेंच पदार्थ]” अशी या पदार्थाला चौथ्याने उपमा दिली आहे. “काका तुम्ही ती पोळी खा, मला फक्त न्यूटेला द्या”, अशी मिश्कील प्रतिक्रिया पाचव्याने दिली आहे.
@bhookkad_beast नावाच्या अकाउंटवरून शेअर झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत २.८ मिलियन इतके व्ह्यूज आणि ३१.२ K इतके लाईक्स मिळाले आहेत.