Friendship Viral Video : मैत्री हे असं नातं आहे, जे रक्ताच्या नात्यापेक्षा अगदी जवळचं आणि घट्ट वाटतं. लोक मित्रासाठी जीवाला जीव देऊ शकतात. ते मित्राच्या मदतीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. सुख-दु:खाच्या क्षणांमध्ये ते कायम त्याच्यासोबत असतात. पण, असा खास मित्र भेटण्यासाठीही नशीब लागतं. सध्या अशा दोन मित्रांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत दोन मित्रांची अनोखी मैत्री पाहून तुम्हीही खूप भावूक व्हाल.
शाळेतील वर्गमित्रांची यारी पाहून तुमच्याही डोळ्यांत अश्रू तरळतील
कल्पना करा की, तुम्ही शाळेच्या वर्गात बसला आहात आणि अचानक भूकंप झाला तर?… अशा वेळी तुम्ही सर्वांत आधी स्वत:चा जीव वाचवाल. पण समजा तुमच्या बाजूला एक अपंग मित्र बसला आहे, जो कुबड्यांशिवाय चालू शकत नाही. अशा वेळी जर खरी मैत्री असेल ना, तर आपसूकच मित्र-मैत्रिणी जीव वाचवण्यासाठी पुढे येतात. कारण- मैत्री ही अशी भावना आहे की, ज्यात आपण स्वतःपेक्षा जास्त मित्र-मैत्रिणींचं सुख पाहतो. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यात शाळेतील वर्गमित्रांची यारी पाहून तुमच्याही डोळ्यांत अश्रू तरळतील.
मित्राच्या निःस्वार्थी कृतीचे होतेय सर्वत्र कौतुक
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, शाळेत वर्ग सुरू आहे. सर्व विद्यार्थी वर्गात अभ्यास करताना दिसत आहेत. यावेळी एका कोपऱ्यातील बाकावर एक दिव्यांग विद्यार्थी व्हीलचेअरवर बसलेला दिसतोय. याचवेळी अचानक भूकंपाचे हादरे बसतात आणि त्यात संपूर्ण शाळा हादरून जाते. हे पाहून सर्व विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागतात. कुणी वर्गाबाहेर पळतंय, कुणी आपला जीव वाचवण्यासाठी इथे-तिथे लपून बसतंय. यावेळी एक अपंग विद्यार्थी त्याच्या बाकावर बसून आहे. कारण- अशा परिस्थितीत अपंगत्वामुळे जागेवरून नीट उठून उभा राहू शकत नाही. पण- सगळे पळून जात असताना त्याचा एक मित्र धावत येतो आणि त्याला पाठीवर उचलून पळत जातो. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, तो आधी मित्राला मदत करतो. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. जो पाहून सारेच जण वर्गमित्रांच्या प्रेमात पडू लागले आहेत. त्याच्या निःस्वार्थी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हा व्हिडीओ @Brink_Thinker नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आता इतका व्हायरल झालाय की, आतापर्यंत या व्हिडीओला ६२.३ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. अनेक जण व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसून येत आहेत. काही युजर्सनी तर त्यांच्या लहानपणीच्या वर्गमित्रांच्या आठवणींत भावना शेअर केल्या आहेत. तर, काहींनी मैत्रीचं खरं उदाहरण असल्याचं सांगितलं आहे.