Viral Video : मैत्री हे असं नातं आहे ज्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीला एक वेगळं महत्त्व आणि स्थान आहे. या मैत्रीच्या नात्यात काळजी, जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेम दिसून येते. मैत्री अडचणीच्या वेळी नेहमी खांद्याला खांदा लावून उभी असते.ज्याच्या आयुष्यात मैत्री सारखे सुंदर नाते आहे, ती व्यक्ती कधीही स्वत:ला एकटी समजत नाही. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांच्या आयुष्यात एक जीवाभावाचा आणि हक्काचा मित्र असतो जो क्षणोक्षणी त्याच्याबरोबर असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन वृद्ध आजोबांची मैत्री दिसून येत आहे. त्यांची मैत्री पाहून कोणीही थक्क होईल.
धडाकेबाज चित्रपटातील “ही दोस्ती तुटायची नाय” हे लोकप्रिय गाणं तुम्ही अनेकदा ऐकले असाल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की ही दोस्ती तुटायची नाय. म्हातारपणात मैत्री जपणाऱ्या या वृद्ध मित्रांना पाहून काही लोकांना त्यांचे जिगरी मित्र आठवतील.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका घरी जेवणाची पंगत बसलेली आहे. पांढऱ्या शुभ्र कपडे परिधान करुन वृ्दध लोकं जेवण करताना दिसत आहे. तिथे एक आजोबा त्यांच्या एका मित्राला जेवण वाढताना दिसत आहे. मित्राला जेवण वाढताना आजोबा पोळी घेण्याचा आग्रह करतात पण त्यांचे मित्र नाही म्हणतात पण तरीसुद्धा आजोबा थोडी पोळी वाढतात. त्यांच्यातील मैत्री पाहून तुम्हीही भारावून जाल.
पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजोबा जेवण करायला बसलेल्या मित्राच्या शेजारी जाऊन बसतात आणि गप्पा मारताना दिसतात. दोघांच्याही चेहऱ्यावरील हास्य पाहून तुमच्या चेहऱ्यावरी हास्य येईल.
vlogs_by_preeti या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “इथ पर्यंत मैत्री टिकवणारी ही कदाचित शेवटची पिढी असावी. मित्र जिवंत नसला तरी पुढे मित्राच्या मुलाबरोबर मैत्री निभावणे म्हणजे किती तो निश्चयी आणि साथ देण्याचे वचन” या कॅप्शनवरुन तुम्हाला कळेल की हे आजोबाचा हा मित्र त्यांच्या मित्राचा मुलगा आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कितीही समजूतदार माणूस असो, त्याचा सगळा बालिशपणा फक्त जिगरी मित्रापुढेच निघतो” तर एका युजरने लिहिलेय, “शेतकरी राजाचं घर दिसतंय” आणखी एका युजरने लिहिलेय, “एवढं हसून खेळून जेवण फक्त शेतकऱ्याचा घरात होऊ शकते.”