Viral Video: ‘काम करा, फळाची इच्छा नको’, अशी एक म्हण तुम्ही सर्वांनी ऐकली असेल. “जसे करावे तसे भरावे, जे देऊ तेच वाढवून मिळते, जे पेराल तेच उगवेल.” हाच कर्म सिद्धांताचा आधार या म्हणींद्वारे व्यक्त होतो. प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस कर्माचं फळ मिळतं, असं अनेकदा म्हटलं जातं. मनुष्य पृथ्वीवर चांगली आणि वाईट दोन्ही कर्मं करतो. चांगल्या कर्मांना पुण्य आणि वाईट कर्मांना पाप म्हणून ओळखले जाते. चांगले कर्म केल्यानं आपल्याला चांगलं फळ मिळतं; पण आपल्या वाईट कर्मांची फळंही आपल्यालाच भोगावी लागतात. अनेकांना याचा प्रत्यय येतो. काहींना त्यांच्या कर्माची फळं उशिरा, तर काहींना लवकर मिळतात. आता कर्माबाबत इंटरनेटवर अनेक व्हिडीओ (Video) व्हायरल होत असतात. असाच एक चांगल्या कर्माची प्रचिती देणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…
व्हायरल व्हिडीओमध्ये काय घडलं?
तुम्ही रस्त्यावरून चालताना अनेकदा पाहिलं असेल की, रस्त्यावर मॅनहोल्स असतात, ज्याला आपण कॉमन भाषेत गटाराचं झाकण, असं म्हणतो. रस्त्यावरची गटारावरील ही झाकणं सुरक्षा आणि सार्वजनिक सुविधांच्या देखभालीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे लोक आणि प्राणी नकळत खाली गटारात पडण्यापासून वाचतात, अनधिकृत प्रवेश टाळला जातो आणि यामुळे सार्वजनिक सुविधांची देखील देखभाल होते.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका ठिकाणी रस्त्यावर मॅनहोलचे कव्हर व्यवस्थित बसवलेले नसल्याचे दिसून येते आणि एक माणूस त्याच्या स्कूटरवरून येताना दिसतो. तो मॅनहोलजवळ पोहोचताच त्याला ते झाकण उघडे असल्याचे दिसते. त्यामुळे तो लगेच स्कूटर थांबवतो. त्यानंतर तो आपली स्कूटर बाजूला काढून तिथून निघून जातो. पण, तिथेच रस्त्याच्या बाजूला असलेला तरुण हे सर्व दृश्य बघतो आणि कुठलाही वेळ न घालवता तिथे येऊन गटाराचे झाकण व्यवस्थित बसवतो. दरम्यान, तो तरुण ज्या जागी उभा होता, तिथेच एक खांब असतो. तो तरुण तिथून निघून गटाराचे झाकण व्यवस्थित बसवायला म्हणून गेल्यावर लगेच तो खांब खाली पडतो. आता जर तरुण तो गटाराचे झाकण बंद करायला गेला नसता, तर त्या तरुणाचा जीव धोक्यात आला असता आणि कदाचित मोठी हानी होऊ शकली असती. पण, तो तरुण थोडक्यात बचावला. या व्हिडीओवरून चांगल्या कर्माचे नेहमीच चांगले फळ मिळते, याची प्रचिती येते.
येथे पाहा व्हायरल व्हिडिओ
तुम्ही नुकताच पाहिलेला व्हिडीओ X प्लॅटफॉर्मवर @IM_esha_ नावाच्या अकाउंटद्वारे पोस्ट केला गेला आहे. या व्हायरल व्हिडीओतील घटना कधी आणि कुठे घडली त्याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु, तो व्हिडीओ पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, केलेले कोणतेही चांगले कर्म कधीही व्यर्थ जात नाही. जर तुम्ही चांगले काम केले, तर तुमचेही चांगलेच होईल.