बाजारातून कोणतीही वस्तू खरेदी करताना थोडी सावधगिरी बाळगणे फार गरजेचे असते. विशेषत: रस्त्यावरून फळं, भाज्या वजनावर खरेदी करताना नेहमी सतर्क असले पाहिजे. कारण विक्रेते कधी कशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करतात सांगता येत नाही, यात अनेक विक्रेते तराजू किंवा वजनकाट्याशी छेडछाड करतात, त्यामुळे तुम्हाला एका किलोत फक्त ८०० ग्रॅम फळं, भाज्या मिळतात. यातून विक्रेता २००-२०० ग्रॅम वजन अप्रत्यक्षरित्या काढतो. फळे आणि भाज्यांचे वजन करून विकणारे विक्रेते कशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करतात याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे एका विक्रेत्यानेच ग्राहकांची वजनात कशी फसवणूक केली जाते याचा खुलासा केला आहे.
विक्रेत्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करणे ही वजन आणि मापन सरकारी अधिकाऱ्याची जबाबदारी आहे, यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात वजन मापन कार्यालये सुरू केली आहेत. यासाठी तहसील स्तरावरही एक बीट अधिकारी असतो, जो तराजू आणि वजनकाट्यांची तपासणी करतो, त्यावर सरकारी मान्यतेचा शिक्का बसतो. त्यानंतर तराजू आणि वजनकाटे वापरले जातात. पण, हल्ली अनेक ठिकाणी विक्रेते सर्रास मनाला वाटेल ते वजनकाटे वापरतात आणि ग्राहकांची फसवणूक करतात.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक विक्रेता तराजूमधून फळं वजन करताना कशी फसवणूक केली जाते हे सांगत आहे. यात विक्रेता सांगतोय की, विक्रेते लोकांना फसवणुकीचे बळी कसे बनवतात. मालाचे वजन करताना विक्रेता तराजूच्या स्केलचा एक भाग (साखळीला जोडलेला सर्वात वरचा नट) फिरवतात, सामान्य भाषेत ज्याला काटा मारणे म्हणतात. तराजूचा एक स्केल फिरवल्याने १ किलोच्या मालात सुमारे २०० ग्रॅम माल कमी होतो. कधीकधी ते ३०० ग्रॅमपर्यंत कमी होते. पण, विक्रेत्यांची काटा मारण्याची ही पद्धत अनेक ग्राहकांना माहीत नाही, त्यामुळे वस्तू खरेदी करताना ग्राहक फक्त तराजूच्या मधल्या सुईकडे लक्ष ठेवतात. पण, तराजूचा स्केल म्हणजे वरच्या आट्याकडे लक्ष नसते. अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक होते.
काही विक्रेते तर स्केलच्या वरच्या टोकाला चुंबक लावतात, त्यामुळे विकत घेतलेल्या वस्तूचे वजन कमी होते. स्केलवरची सुई पाहून तुम्हाला वजन बरोबर असल्याचे दिसते. पण, यातही विक्रेता तुमची फसवणूक करत असतो. यामुळे वस्तू खरेदी करताना वजनकाटा आणि त्याची स्केल तपासा. विक्रेत्याने कुठे लोहचुंबक चिटकवले नाही ना याची खीत्री करा, वजनात घट वाटत असल्यास तात्काळ एखाद्या दुकानात जाऊन तुमच्या वस्तूचे वजन चेक करा, वस्तूचे वजन कमी असल्यास तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडे जाऊन तक्रार करा.