देशातील आघाडीची शिक्षण आणि तंत्रज्ञान कंपनी बायजू (Byju) विद्यार्थ्यांसाठी एक ऑनलाइन शिकवणी मंच आहे, तर मार्केटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या तुम्हाला सेवा आवडत नसल्यास किंवा एखाद्या गोष्टीचा तुम्ही वापर न केल्यास पैसे परत देण्याचा दावा करतात. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञान कंपनी Byju’s च्या कस्टमर पॉलिसीमध्येसुद्धा तशी तरतूद देण्यात आली आहे. पण, पॉलिसीनुसार कंपनीने पैसे परत न दिल्यामुळे एका कुटुंबाने अगदीच टोकाचे पाऊल उचलले आहे.
प्रकरण असे आहे की, एका विद्यार्थ्याच्या आई-वडिलांनी न वापरलेला टॅबलेट आणि काही लर्निंग प्रोग्राम्ससाठी कंपनीकडे पैसे परत देण्याची विनंती केली. तसेच पॉलिसीमध्ये लिहिलेल्या कालावधीच्या आधीच या कुटुंबाने कंपनीकडे पैसे मागितले होते. तरीदेखील या घटनेची कंपनीने दखल घेतली नाही, तर रागात येऊन या कुटुंबाने चक्क बायजूच्या ऑफिसमध्ये जाऊन तेथील टीव्ही काढून घेतला आहे. ‘पैसे द्या आणि टीव्ही घेऊन जा’ असेदेखील हे कुटुंब व्हिडीओत सांगताना दिसले आहे.
हेही वाचा…जिलेबी विक्रेत्याचा ‘तो’ VIDEO पाहून आनंद महिंद्राही झाले अवाक्; म्हणाले, ‘तंत्रज्ञानाचा शौकीन…’
व्हिडीओ नक्की बघा :
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओनुसार, कुटुंबाने पैसे परत करण्याची खूप विनंती केली. पण, त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. अनेक आठवडे प्रयत्न करूनही कंपनीकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे त्यांनी थेट ऑफिसला भेट दिली आणि तेथे बसवलेला टीव्ही कुटुंबातील वडील आणि त्यांच्या लेकाने काढून टाकला. ऑफिसमधील काही कर्मचारीदेखील तेथे उपस्थित होते. पण, कुटुंबाने सांगितले की, “पैसे द्या आणि टीव्ही घेऊन जा.’ आता या घटनेमुळे बायजू उद्योगातील ग्राहक सेवा पद्धती आणि पैसे परत देण्याच्या पॉलिसीबद्दल चर्चा झाली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @lafdavlog या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओला ‘पैसे परत द्या आणि टीव्ही घेऊन जा’, असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांच्या भावना कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत. अनेक जण कुटुंबाचे धाडसी कृत्य पाहून हसत आहेत, तर काही त्यांच्या धाडसी निर्णयाला दाद देताना दिसत आहेत.