तसं पाहायला गेलं तर आपल्या देशात पेट्रोलच्या तुलनेत डिझेल स्वस्त आहे. पण हेच डिझेल कर्नाटकातल्या आमदाराला भलतंच महाग पडलं ना! काँग्रेसचे कर्नाटकातले आमदार मोहिउद्दुन यांनी Volvo XC90 T9 ही दीड कोटी किंमतीची लक्झरी कार विकत घेतली. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ही कार भारतात लाँच करण्यात आली होती. मोहिउद्दुन भावा यांच्या नावांवर अनेक खाणी आहेत तेव्हा घरात पैशांची खाण नसेल तर नवलंच. आता बाबांनी एवढी महागडी गाडी घेतल्यावर त्यांच्या पुत्रांना ती चालवण्याचा मोह अनावर झाला.

मग काय मुलगा निघाला गाडी घेऊन, पण गाडीत कमी पेट्रोल असल्याचे लक्षात आल्याने त्याने गाडी पेट्रोल पंपवर नेली. आता पुढचा घोळ असा झाला की पेट्रोल पंपवरील कर्मचा-यांनी पेट्रोलऐवजी चुकून डिझेल भरलं. त्यामुळे या लक्झरी कारचं काय झालं हे वेगळे सांगायला नको. तेव्हा फ्युएल टँक आणि सिस्टिम क्लिन करण्यासाठी या आलिशान गाडीला ट्रकमध्ये टाकून बंगळुरुला नेण्यात आल्याचे इथल्या स्थानिक वृत्तवाहिनी डायजी वर्ल्डने म्हटले आहे. पण आलिशान गाडीची वाट लावल्यावर आमदार साहेब भडकले नाहीत हे कर्मचा-यांचे नशीब. शेवटी माणसंच ती, चुका होणारच त्यांच्याकडून असे म्हणत बडे दिलवाल्या आमदारांनी कर्मचाऱ्यांना माफ केले असल्याचेही या वृत्तवाहिनीने म्हटले.

 

Story img Loader