ऑनलाईन शॉपिंग आता सामान्य गोष्ट झाली आहे. शहरांसोबतच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर ई कॉमर्स साईटवरुन शॉपिंग केली जाते. आजकाल कपडे, मोबाईल, जेवण असो किंवा किराणा सामान. फक्त फोनवरुन ऑर्डर द्या आणि घरबसल्या सामान मिळवा. मात्र आपण ऑर्डर केलेलं सामान आपल्यालाच मिळेल का? याची काहींना शंका असते. अनेकदा घरच्या पत्त्यात घोळ असेल तर डिलिव्हरी वेळवर मिळत नाही. खासकरुन ग्रामीण भागात आपल्या नावाचे पार्सल दुसरेच कुणीतरी घेण्याची भीती असते. त्यामुळे काही लोक असे असतात जे खूप काळजीपूर्वक आपला पत्ता लिहितात. मात्र राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने इतका सखोल, सविस्तर आणि विस्तृत असा पत्ता लिहिलाय की जो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

जोधपूर मधल्या भिकाराम नावाच्या व्यक्तिने फ्लिपकार्टवरुन ऑर्डर मागवली होती. ४ जानेवारी रोजी त्याला त्याचे पार्सल मिळाले. आपण गावात एखाद्याला, “खालच्या आळीतून वरच्या बाजूला, डाव्या अंगाला वळल्यावर नाकासमोर दिसेल ते झाड, त्याच्या उजव्या बाजूच्या विहिरीसमोर…” असा पत्ता सांगताना ऐकलं असेल. अशाच पद्धतीने पत्ता लिहून भिकारामने डिलिव्हरी बॉयला जणू गुगल लोकेशन पेक्षाही परफेक्ट असा पत्ता मिळाला.

हे वाचा >> Video : ना बिळात, ना गवतात, साप घुसला थेट प्रिंटरच्या कागदात…तरुणीनं प्रिंटर उघडला अन् तितक्यात…

त्याच्या पत्त्यावर लिहिलं होतं, “भिकाराम, हरि सिंह नगर, गिलाकोर गावं से १ किलोमीटर, पहिला राइट साइड अपने खेत का गेट है, लोहे का गेट है, पास में एक छोटी फाटक है और गेट के पास काला मूंगिया डाला हुआ है. वहाँ आकर फोन करना, मै सामने आ जाऊंगा.” अशा पद्धतीने पत्ता लिहिल्यामुळे भिकारामच्या पार्सलचा फोटो चांगलाच व्हायरल झाला. इतक्या बारकाईने पत्ता लिहिल्याचे वाचून अनेकांना हसू आवरले नाही.

फ्लिपकार्टवरुन मागविलेल्या एका ऑर्डरचा हा पत्ता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निशांत नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटर हँडलवर सदर पत्त्याचा फोटो शेअर केला आहे. “डिलिव्हरीवाला मरेपर्यंत हा पत्ता लक्षात ठेवेल”, असे कॅप्शन हा पत्ता शेअर करताना दिले आहे. इतर अनेकांनी देखील डिलिव्हरी बॉक्सवर पत्ता लिहिलेला फोटो शेअर केला आहे. अनेक लोक कमेंट्सच्या माध्यमातून पार्सलच्या मालकाचे कौतुक करत आहेत. तर काहींना ही फोटोशॉपची कमाल वाटते. कुणीतरी मुळ पत्त्यावर खोटा पत्ता एडिट केला असावा, अशी शंका काहीजण व्यक्त करतायत.

Story img Loader