हा जाम विचित्र किस्सा आहे. पण सगळ्यात आधी हा प्रकार तरी काय आहे पाहू.
खारीसारखा गोंडस प्राणी दुसरा कुठलाच नसेल. लहान मुलांच्या बडबडगीतांमध्ये तसंच लहानपणच्या आठवणींमध्ये या सुंदरशा प्राण्याला एक छानसं स्थान असतं. रामायणातल्या कथेतही या खारीला जागा मिळाली आहे.
अशा या गोड प्राण्याला ठार करा असं कोणी म्हणू शकेल यावरच आपला विश्वास बसणं कठीण आहे. पण अमेरिकेतल्या शिकागो शहरात ही घटना घडली.
शिकागोमधल्या सिटी काऊन्सिलमध्ये (म्हणजे तिथली महानगरपालिका!) एका सदस्याने शिकागोमधल्या खारींची संख्या कमी करण्याचा प्रस्ताव आणला. या महाशयांचं नाव आहे आल्डरमन.
तर आल्डरमन साहेबांचं असं म्हणणं होतं की शिकागोमध्ये खारींचा सुळसुळाट झाला आहे. या खारी सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या प्लास्टिकच्या कचरापेट्यांना कुरतडून त्यांची दुर्दशा करत आहेत आणि या कचऱ्यापेट्या दुरूस्त करण्यासाठी शिकागो शहराला आर्थिक भुर्दंड भोगावा लागतोय. आता हा भुर्दंड किती तर तीन लाख डाॅलर्सचा! म्हणजे खारींनी कचरापेट्या कुरतडल्याने शिकागो शहराचं जवळपास २ कोटी रूपयांचं नुकसान होत असल्याचा शोध आल्डरमन यांनी लावला आणि यावर उपाय काय तर म्हणे खारींची संख्या कमी करा.
या विचित्र ठरावामुळे काऊन्सिलमधले बाकीचे सदस्य चक्रावले. आता कोणालाही ठराव मांडण्याचं स्वातंत्र्य असल्याने हा ठराव मांडला तर गेला. पण या विनोदी प्रकारावर आपलं हसू दाबत बाकी सदस्यांनी आणि सभापतींनी लोकशाही मार्गाने या ठरावाची ‘विल्हेवाट’ लावली.
हा प्रकार हास्यास्पद आहे. पण याच्यापुढे झालेल्या घटनेने सगळेजण आणखीनच हसून बेजार झाले.
तर झालं काय, आल्डरमन साहेब त्यांच्या एरियामध्ये सायकल चालवत होते. आणि अचानक दोन-चार खारींचा एक समूह रस्त्यावर आला. ही हिंस्त्र जनावरं अशी अनपेक्षितपणे आपल्यासमोर आल्याने आल्डरमननी कचकचून ब्रेक दाबला. आणि त्या गडबडीत साहेबांचं धूड त्यांच्या सायकलवरून फेकलं जात रस्त्यावर आपटत त्यांचे काही दात तुटले, त्यांच्या नाकाला आणि डोक्याला जखम झाली आणि त्यांना हाॅस्पिटलमध्ये न्यावं लागलं.
करावे तसे भरावे वगैरे म्हणत असले तरी आल्डरमन महाशयांच्या बाबतीत घडलेला प्रकार जामच विनोदी आहे!