माननीय ‘अमुक अमुक’ (यात कुठल्याही बड्या नेत्याचं किंवा नगरसेवकांच्या तिसऱ्या फळीतल्या धडाडीच्या कार्यकर्त्यांचे नाव लावा.)
ते नावपण नुसतं नाही. तर पूर्वी ज्याप्रमाणे आपल्या घराच्या नेमप्लेटवर डिग्र्यांची बाराखडी लिहायचे तसं या वरच्या नावापुढे दादा, भाई, रावजी, राव, सम्राट वगैरे उपाध्यांची मोठीच्या मोठी लाईन. मग पुढच्या लाईनमध्ये ‘यांना शुभेच्छा’ किंवा ‘उदंड आयुष्य लाभो’, ‘आगे बढो’ वगैरे. त्याच्या पुढच्या ओळीत ‘शुभेच्छुक’ असा छोटासा शब्द. आणि त्यापुढे पोस्चरचा खरा भाग सुरू.
या ‘शुभेच्छुक’ च्या पुढे त्या पोस्टरवर जी काही झुंबड उडालेली असते ती विचारता सोय नाही. गावच्या जत्रेत चार माणसं जास्त येतील!
य़ा नेत्याचे शुभेच्छुक म्हणवणाऱ्यांमध्ये त्या नेत्याच्या उजव्या हातापासून ते त्या नेत्याच्या गणपतीसाठी ११ रूपयांची वर्गणी फाडून आणणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांचे ‘फोटू’ असतात
आता अशी पोस्टर्स गल्लीगल्लीत सापडतात. पण आता वरचं पोस्टर पाहा.
या पोस्टरमध्ये माननीय टाॅमी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असं लिहित चक्क एका कुत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. !आणि त्यांचे शुभेच्छुक कोण तर ब्रुनो, मोती असे त्यांचे श्वानसवंगडी !
हे एक वेगळंच पण मजेशीर पोस्टर ठाणेकरांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे. ठाण्यातल्या नौपाडा परिसरात लावण्यात आलेलं हे पोस्टर ‘नौपाडा बचाव नागरी कृती समितीतर्फे लावण्यात आलंय. ठाण्यातल्या राजकीय नेत्यांच्या पोस्टरबाजीला हे पोस्टर लावत कृती समितीने काहीसा विडंबनात्मक टोला दिलाय.
VIDEO : ‘सीसीडी’च्या फ्रीजमध्ये झुरळं, तक्रार करणाऱ्याच्या कानाखाली वाजवली
नौपाड्यात लागलेल्या या पोस्टरने ठाणेकर नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक होते आहे. अनेकजण या पोस्टरसोबत आपला सेल्फी काढून घेत आहेत, तसंच या पोस्टरचा फोटोही काढत आहेत.
एकूणच नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर ‘आमचं शहर आम्हाला परत करा’ या सामान्य नागरिकांच्या भावनांना उत्तमरीत्या वाचा फोडण्याचं काम या पोस्टरने केलंलं आहे.