काही चोर फार मजेशीर असतात बुवा! त्यांची चोरी करण्याची स्टाईल पाहिली की हसावं की रडावं हेच कळेनासं होतं, आता याच महामूर्ख चोराचं घ्या ना! हा चोर गॅरेज लुटायला निघाला होता. आता एवढं मोठं गॅरेज लुटायला जातोय तर थोडा अभ्यास तरी करायचा ना! आता आजच्या काळात ‘गदामजुरी’ करण्यापेक्षा माणसानं कसं ‘स्मार्ट वर्क’ करावं एवढा साधाही नियम या पठ्ठ्याला ठावूक नाही तेव्हा त्यानं असं काय केलं की जे पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारला नसेल तर नवल.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये या चोराची चोरी करण्याची अजब शक्कल रेकॉर्ड झालीय. आजूबाजूला कोणी नाही पाहताच या चोराने गॅरेजचं दार उघडण्याचा प्रयत्न केला पण ते काही शक्य झालं नाही. तेव्हा पठ्ठ्याने आपली होती नव्हती ती सारी शक्ती एकवटून गॅरेजची खिडकी उघडली आणि कसाबसा गॅरेजचा दरवाजा उघडण्यात देखील तो यशस्वी झाला. आपण एवढी मेहनत घेतल्याचा काय आनंद या चोराला झाला होता. पण त्याच्या आनंदावर लवकरच विरजण पडलं, कारण जेव्हा तो गॅरेजच्या आत पोहोचला तेव्हा त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की हे गॅरेज एक बाजूनं सताडं उघडच होतं. त्याला भिंत नव्हतीच. कोणीही सहज बाहेरून आत आलं असतं. तेव्हा आपली मेहनत वाया गेली हे जेव्हा बिचाऱ्याला समजलं तेव्हा जे काही झालं ते पाहण्यासारखं होतं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांना हा व्हिडिओ पाहून आपलं हसू अनावर होत होतं.