Viral Video: लहान मुलांना बऱ्याचदा जी गोष्ट करू नको, असं सांगितलं जातं. नेमकी तीच गोष्ट ते आवडीनं करतात. त्यामुळे आई-वडिलांची नेहमीच चिडचिड होते. अशा वेळी ते मुलांवर रागावतात, मारहाण करतात किंवा त्यांना काहीतरी शिक्षा देतात. पण, तरीही मुलं सुधारण्याचं नाव घेत नाहीत. त्याशिवाय यामुळे त्यांच्या मनावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा वेळी पालकांनी डोकं शांत ठेवून नेमकं काय करायला हवं, हे आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
मुलांना चूक केल्यावर त्यांना मारहाण करणाऱ्या पालकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे तुम्ही पाहिले असतील. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मुलांनी सुधारावं यासाठी पालकांनी हटके पद्धत अवलंबल्याचं पाहायला मिळतेय, जी पाहून नेटकरीही त्यांचं कौतुक करीत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन लहान मुलं घरी काहीही न सांगता घराबाहेर जातात आणि खूप वेळानंतर घरी परत येतात. परंतु, मुलं घरी येण्याआधीच त्यांचे बाबा घरी पोहोचतात. त्यानंतर मुलं घरी आल्यावर आई मुलांच्या गळ्यात फुलांचा हार घालते आणि बाबा त्यांचा दिव्यानं औक्षण करून मुलांचा सत्कार करतात. मुलांनी केलेली चूक त्यांना अशा प्रकारे दाखविल्यामुळे अनेक जण या आई-बाबांचं कौतुक करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @natepute_business_hub या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स आल्या आहेत. त्याशिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “मारू वगैरे नका हो. त्यांचं वय आहे खेळायचं.” आणखी एका युजरनं लिहिलंय, “शाल-नारळ देऊन सत्कार करा.” तर आणखी एकानं लिहिलंय, “अतिशय सुंदर सोनेरी क्षणांचे साक्षीदार. खरी आपुलकी… पण नंतर मारू नका.”