G20 Summit Gala dinner : जी २० शिखर परिषदेसाठी भारतात जगभरातील नेते दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डिनरचे आयोजन करण्यात आले होते. भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या या डिनरसाठी अनेक मेजवानींची आरास करण्यात आली होती. यामध्ये मुंबईती पदार्थाचाही समावेश असल्याची माहिती इंडिया टुडेने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या समृद्ध संस्कृती आणि वारशाची झलक दाखवण्यासाठी पाहु्ण्यांना खास चांदी आणि सोन्याचा मुलामा चढवलेल्या भांड्यांवर जेवणाची सोय करण्यात आली. गुंतवणूक, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधांसह पदार्थाच्या चवीनेही भारताला जगासोबत जोडायचं आहे, यासाठी खास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी भारतातील अनेक स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल या मेजवानीत होती. यंदाचे वर्ष हे भरडधान्यांना समर्पित असल्याने भारतीय पदार्थांच्या मेन्यूमध्ये भरडधान्याचा सुद्धा कल्पकतेने समावेश करण्यात आला आहे.

स्टार्टरमध्ये काय?

स्टार्टरमध्ये पत्रम हा पदार्थ होता. पत्रममध्ये बाजरीच्या पानातून दही आणि चटणी दिली जाते. हा पदार्थ कुरकुरीत आणि चटपटीत असतो.

मेन कोर्ससाठी खास पदार्थ

मेन कोर्समध्ये वनवर्णम ठेवण्यात आले. फणसाचे गरे फॉरेस्ट मशरूम, भरडधान्य आणि कोंथिबिरीसह दिले जातात. यासोबत केरळचा तांदूळही होता.

इंडियन ब्रेड्साठी मुंबईचा पावची निवड

महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मुंबई पाव हा प्रसिद्ध पदार्थ ठेवण्यात आला. कांद्याच्या बियांपासून बनवलेला मऊ पाव मुंबई पाव म्हणून देण्यात आला होता.

मिष्ठान्नमध्ये काय?

मिष्ठान्नमध्ये मधुरिमा हा पदार्थ ठेवण्यात आला. नावातच गोडवा असलेला हा पदार्थ सुगंधित वेलची, खीर, अंजीर यापासून बनवलेला आहे.

शीतपेय कोणते?

पेयांमध्ये काश्मिरी कहवा , फिल्टर कॉफी आणि दार्जिलिंग चहा यांचा समावेश होता. जेवणाच्या शेवटी, मान्यवरांना पान -स्वाद चॉकलेटच्या पानांचंही वाटप करण्यात आले.

१७० जणांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव, चीनचे पंतप्रधान ली कियांग आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी एकूण १७० जणांना निमंत्रण देण्यात आले होते. परदेशी नेते आणि शिष्टमंडळांच्या प्रमुखांव्यतिरिक्त सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, कॅबिनेट आणि राज्यमंत्री, केंद्र सरकारचे सचिव आणि इतर मान्यवर पाहुण्यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रण होते. महत्त्वाचं म्हणजे, अनेक पाहुण्यांनी या कार्यक्रमासाठी पारंपरिक वस्त्रे परिधान केली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: G20 dinner menu celebrates millets diversity taste connects bharat sgk