Viral photo: आपल्या लोकांना नोटांवर काही ना काही लिहायची सवय आहे. अशा अनेक नोटांवर तर बरंच काही लिहिलं जातं. असाच एक महत्त्वाचा संदेश पाठवण्यासाठी या नोटेचा वापर केल्याचं दिसून आलं आहे. पन्नास रुपयांच्या एका नोटेवर प्रेयसीने त्याच्या प्रियकरासाठी संदेश लिहला आहे. काही वर्षांपूर्वी, ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असे लिहलेली एक भारतीय चलनी नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर लोकांनी त्याची खूप खिल्ली उडवली. यावरून बरेच मीम्स बनवले गेले. आता असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गर्लफ्रेंडनं आपल्या बॉयफ्रेंडसाठी ५० रुपयांच्या नोटेवर एक गोष्ट लिहून ती सोशल मीडियावर शेअर केली आहे. पुर्वीच्या काळी कबुतराच्या माध्यमातून प्रेम संदेश पाठवला जायचा. मात्र आता संपर्क करण्याची साधने बदलली आहेत. सोशल मीडियाच्य काळातही आजही अनेकजण नोटेवर संदेश पाठवताना दिसत आहेत. अशाच या नोटेवरचा मेसेज सध्या व्हायरल होत आहे.
यामध्ये एक बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडची चांगलीच फसवणुक केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वत्र गाजावाजा होताना दिसत आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून सोशल मीडियावर भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एकीकडे विरोधी पक्षांकडून या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे शिंदे सरकार या योजनेबाबत नवनवीन माहिती समोर आणत आहे. परंतु, ज्या महिलांना या योजनेचे ३००० रुपये मिळाले आहेत, त्यांच्या आनंदाला तर पारावरच उरला नाहीय. मात्र एका तरुणीनं हे पैसे तिच्या बॉयफ्रेंडला दिले आणि फसली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशी फसली? तर त्याचं उत्तर या नोटेवर आहे.
या व्हायरल झालेल्या नोटेवर तुम्ही पाहू शकता, “गणेश मला ब्लॉकमधून काढ. नवीन मोबाईल घेण्यासाठी मी तुला लाडकी बहिण योजनेचे पैसे सुद्धा दिले.तूच आता असं वागणार का माझ्यासोबत. प्लीज माझ्याशी असं वागू नकोस. माझ्या कॉलला रिप्लाय दे. मी तुझ्या फोनची वाट पाहतेय. सोनाली-गणेश” ही नोट आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.
पाहा व्हिडीओ
या पोस्टवर बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी याला गांभीर्याने घेतलं आणि आपण गणेश-सोनाली यांना भेटवणारच असा निश्चय केला आहे. सोनालीचा हा मेसेज त्या गणेशपर्यंत पोहोचवण्यासाठी काहींनी धडपड सुरू केली आहे. तर काही लोकांनी हे मजेत घेत त्यावर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.