Ganesh Chaturthi 2024 Elephant welcomes bappa Viral Video: आज गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरांत बाप्पा विराजमान झाले आहेत. मुंबईत वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात अनेक मंडळांच्या गणेशमूर्तीचं आगमन पार पडलं. गेल्या महिनाभरापासूनच गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू झाली होती. हा भव्य उत्सव बुद्धी आणि समृद्धीची देवता असलेल्या भगवान गणेशाच्या आगमनाप्रीत्यर्थ साजरा होतो.
मुंबई-पुण्यात गणेशोत्सव अगदी थाटामाटात पार पडतो. उंच गणेशमूर्ती आणि भव्य-दिव्य सजावट हे विशेषत: मुंबईतील गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण मानलं जातं. या ११ दिवसांमध्ये सोशल मीडियावर गणरायाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. यंदा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय; ज्याची सर्वत्र चर्चा आहे.
व्हायरल व्हिडीओ
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओेनं सगळ्याच गणेशभक्तांचं लक्ष वेधून घेतलंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये गणरायाचं थाटामाटात आगमन होताना दिसत आहे. या गणेशभक्तांच्या गर्दीत एक भक्त असा आहे की, ज्यानं चक्क त्याच्या स्टाईलनं बाप्पाच्या आगमनाचं स्वागत केलंय. हा भक्त दुसरा-तिसरा नसून एक गोड हत्ती आहे. सर्व जण या भक्तीमय वातावरणात तल्लीन असताना त्या हत्तीनं गणरायाच्या या भव्य मूर्तीला फुलांचा हार घातला आणि बाप्पाचं स्वागत केलं. हार घालताच आपली सोंड वर करून त्यानं बाप्पााला नमस्कारदेखील केला.
हा व्हिडीओ @adultsociety या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, अशी कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आली आहे. अवघ्या तासाभरात या व्हिडीओला दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आल्या आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं कमेंट करीत लिहिलं, “गणपती बाप्पाला हार घालून गजराज खूप खुश आहेत.” तर दुसऱ्यानं ‘वर्षातील सर्वोत्तम व्हिडीओ’, अशी कमेंट केली. अनेकांनी गणपती बाप्पा मोरया, अशी कमेंट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ खूप जुना असल्याचं सांगितलं जातं. परंतु, दरवर्षी गणेशोत्सवात हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो. हा व्हिडीओ कुठला आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. या व्हिडीओतील गजराजाचं लाडक्या बाप्पावरील प्रेम आणि त्याची भक्ती पाहून अनेकांचे डोळे पाणावले.