Mumbai Ganesh Utsav 2024 Viral Video: लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही आठवडे शिल्लक आहेत.(Ganesh Chaturthi 2024) यात मुंबईत ढोल-ताशांच्या गजरात वाजत- गाजत अनेक गणेश मंडळांमध्ये बाप्पाच्या आगमन सोहळ्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील अनेक मोठ्या मंडळांमध्ये बाप्पाची मूर्ती आणत सुंदर देखावे अन् सजावटीची जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे मुंबई गणेशोत्सवाला अगदी थाटात सुरुवात झालीय, असे म्हणायला हरकत नाही. दरम्यान, मुंबईतील अशाच एका गणेश मंडळाचा गणपती आगमन सोहळा सुरू होता.
मुंबईकरांच्या सजगतेचे कौतुक
गणपती बाप्पा मोरया…असा जयघोष सुरू होता. लोकांना पाय ठेवायला जागा नाही इतकी गर्दी होती, बाप्पाची पहिली झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त बाप्पाच्या भव्य मिरवणुकीत सामील झाले होते. यावेळी रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज आला. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सजगतेमध्ये बदलला. लागलीच रुग्णवाहिकेला जागा करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी हालचाल सुरू केली अन् गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यावर रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देण्यात आली, यातून मुंबईकरांच्या माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले. गणपती बाप्पाच्या मिरवणुकीतील काळजाला भिडणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर अनेकांनी मुंबईकरांच्या सजगतेचे कौतुक केलेय.
अलोट गर्दीतही मुंबईकरांनी जपलं समाजभान
मुंबईतील गणपती आगमन सोहळा म्हणजे एक वेगळा माहोल असतो. गणेश मंडळातील कार्यकर्त्यांसह हजारो संख्येने तरुण-तरुणी या आगमन सोहळ्यात सहभागी होतात. पारंपरिक लोककला, लोकनृत्य, संगीत, वाद्य अन् बँजोच्या तालावर ठेका धरत भक्त लाडक्या बाप्पाचे स्वागत करतात. हा आगमन सोहळा पाहण्यासाठी केवळ मुंबईच नाही तर ठिकठिकाणचे लोक येत असतात. या व्हिडीओमध्येपण तुम्ही पाहू शकता, मुंबईतील एका मोठ्या गणेश मंडळाच्या गणपतीचा आगमन सोहळा सुरू आहे, रस्त्यावर आणि आजूबाजूला मोठ्या संख्येने गर्दी होती, या गर्दीतून एखादं वाहन जाईल की नाही अशी शक्यता कमीच होतीच. मात्र, बाप्पाचे दर्शन घेत उभ्या असलेल्या मुंबईकरांनी रुग्णवाहिका पाहताच लगेच तिला वाट मोकळी करून दिली. इतक्या अलोट गर्दीतही मुंबईकरांनी ज्या प्रकारे समाजभान जपलं आहे, त्याचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.
Read More Ganesh Chaturthi 2024 Trending News : मुंबईतील सात लोकप्रिय व मानाचे गणपती कोणते? जाणून घ्या …
पोलिसही या ठिकाणी उपस्थित होते, मात्र गर्दी खूप होती. दरम्यान, गणेशभक्तांनी ती रुग्णवाहिका पाहिली आणि पोलिसांना सहकार्य करत काही क्षणात रस्ता मोकळा केला. यावेळी मुंबईकरांचा हा समाजभान दर्शवणारा व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे.
‘मुंबई मेरी जान है’ युजर्सच्या कमेंट्स
मुंबईकरांची सजगता दाखवणारा हा व्हिडीओ @maazaganesha नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अनेकांनी मुंबईकरांची ही कृती खरंच माणुसकीचे दर्शन घडवणारी आहे असे म्हटले आहे; तर काहींनी ‘म्हणून मुंबई आमची आहे’, असे म्हटले आहे. तर अनेकांनी गणपती बाप्पा मोरया म्हणत ‘मुंबई मेरी जान है’ अशी कमेंट केली आहे. गणेशोत्सवातील हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.