Viral Video : सध्या देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे; पण तुम्हाला माहीत आहे का सातासमुद्रापलीकडेही गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. हो, जर्मनी देशातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. येथील गणेशोत्सव पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
देशाबाहेर आपली महाराष्ट्राची संस्कृती जपणारे लोक पाहून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल. अनेक भारतीय शिक्षण आणि नोकरीसाठी आपल्या मातीपासून दूर परदेशांत राहतात. मात्र, तिथे राहून ते आपली संस्कृती जपताना दिसून येतात. भारतातील सर्वांत मोठा सण असलेला गणेशोत्सवही ते लोक परदेशात तितक्याच आवडीने साजरा करताना दिसून येत आहेत. जर्मनी देशातील एर्लंगेन शहरातला हा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहाच.
व्हिडीओ पाहून तुम्हाला क्षणभरासाठीही वाटणार नाही की हा व्हायरल व्हिडीओ भारताबाहेरचा आहे. अगदी ढोल-ताशांच्या गजरात महिला नऊवारी साडी नेसून आणि पुरुष फेटा बांधून जर्मनीत उत्साहाने गणेशोत्सव साजरा करताना व्हिडीओत दिसत आहेत.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, सार्वजनिक ठिकाणी गणेशाची एक मूर्ती बसवलेली आहे. या मूर्तीसमोर महिला नऊवारी साडी नेसून आणि पुरुष फेटा बांधून नृत्य करताना दिसत आहेत. व्हिडीओत काही वारकरी भजन-गीत गात टाळ वाजवताना दिसत आहेत.
या व्हिडीओत तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा, लाठीकाठीचा खेळ, वारकऱ्यांचे अभंग, भजन, भक्तिगीते आणि ढोल-ताशांचा गजर दिसून येईल. एकंदरीत महाराष्ट्राची संस्कृती तुम्हाला या व्हिडीओतून दिसून येईल. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच येथे आनंदाने गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहेत.
हेही वाचा : Optical Illusions : लोकांच्या गर्दीत विराट कोहली दिसतो का? एकदा नीट क्लिक करून पाहा
sonali_breddy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लग्नानंतरचा माझा पहिलाच गणपती उत्सव आपल्या मातीपासून लांब आपल्या देशाबाहेर असल्याने फार वाईट वाटत होतं; पण परदेशात राहून आपल्या मातीशी नाळ कशी जपली जाते हे आज पाहिलं. जर्मनी येथील एर्लंगेन या शहरामध्ये आज गणेशोत्सवाचा कार्यक्रम पाहिला. खूप सुखद अनुभव होता एकंदरीत.”
पुढे कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आपल्या मातीपासून लांब राहूनही आपला सण आणि उत्सव यांचा भरघोस उत्साहात आनंद घेऊन आपल्या संस्कृतीचा मान कसा जपला जाऊ शकतो, हे शिकायला मिळालं. सातासमुद्रापलीकडेही आपली भाषा आणि संस्कृतीचा वाजत असलेला डंका पाहून मन अगदी अभिमानानं भरून आलं. मला या सोहळ्याचा भाग होता आलं, याचं खूप समाधान वाटलं. गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया…”