kanpur gangster ajay thakur Viral Video : उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात एक कुख्यात गँगस्टर १२ काळ्या रंगाच्या गाड्या घेऊन गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघाल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर एकपाठोपाठ एक अशा या १२ गाड्यांचा ताफा निघाल्याने सर्वांचे लक्ष याकडे वेधले गेले. दावा केला जात आहे की, नंबर प्लेट नसलेल्या या गाडीमधून हा गँगस्टर डीसीपी दक्षिण कार्यालयाच्या जवळच्या मैदानावर पोहचला होता. येथे गँगस्टर आणि त्याच्या साथीदारांनी स्टंटबाजी केली, रील्स बनवल्या आणि सोशल मीडियावर पोस्ट देखील केल्या. पण या सर्व प्रकाराचा कथित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आणि आरोपी अजय ठाकूर याला अटक करण्यात आली आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी गँगस्टर ठाकूर याचा हा ५० सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये सुमारे १२ गाड्या घेऊन रस्त्यावरून जाताना तो दिसथ आहे. गँगस्टरची गाडी सर्वात पुढे असून त्याच्या मागे दोन हूटर लावण्यात आल्याचे पाहायला मिशत आहे. विशेष बाब म्हणजे या गाडीची नंबर प्लेट गायब आहे. गँगस्टर जी कार चालवत आहे त्यामध्ये एक तरुणी देखील दिसत आहे जी त्याची गर्लफ्रेंड असून तिचा सोमवारी वाढदिवस होता असे सांगितले जात आहे. या गाडीच्या मागे इतर गाड्यांचा ताफा जाताना दिसत आहे.
आरोपीविरोधात ३०हून अधिक गुन्हे दाखल
गँगस्टर अजय ठाकूर याच्यावर बलात्कार, हत्येचा प्रयत्न, दगडफेक अशा अनेक गंभीर गुन्ह्यांसह ३०हून अधिक खटले दाखल आहेत. या आरोपीचे वय ३० वर्षांच्या आसपास आहे. याच्यावर एक लाखाचे बक्षिस देखील जाहीर करण्यात आले होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याला पकडून तुरुंगात टाकण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला आहे.
हेही वाचा>> अकोला : सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, मिटकरींच्या आरोपाने खळबळ
दरम्यान सोमवारी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी अजय ठाकूर याला अटक केली. तसेच पोलीस इतर तरुणांचा देखील शोध घेत आहेत. डीसीपी ट्रॅफीक रविंद्र कुमार यांनी सांगितले की, नंबर प्लेट आणि हूटर बसवलेल्या गाड्यांविरोधात मोहिम राबवली जात आहे. यादरम्यान गँगस्टरचा असाच व्हिडीओ व्हायरल झाला असून स्थानिक पोलिसांना सूचना देऊन कारवाई करण्यास सांगितले आहे.