Kolhapur Jyotiba Mandir Decoration: सोशल मीडियावर सध्या गणेशोत्सवाचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. आज गणेशोत्सवाचा नववा दिवस असून सोशल मीडियावर अनेक युजर्स घरच्या गणपती बाप्पाचे, तसेच विविध गणेशोत्सव मंडळांतील देखावे शेअर करीत आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. आतापर्यंत आषाढी वारी, शिव-पार्वती विवाह सोहळा असे विविध देखावे तुम्ही पाहिले असतील. पण आता समोर आलेल्या व्हिडीओतून एका व्यक्तीने कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिराचा देखावा दाखविला आहे; जो खूप चर्चेत आहे.
गणेशोत्सव काळात गणपतीच्या सुंदर मूर्तीबरोबर विविध पद्धतीची सजावटही सोशल मीडियावर चर्चेत असते. दख्खनचा राजा ज्योतिबा अनेकांचे कुलदैवत आहे. नुकत्याच इस्लामपूर येथील एका व्यक्तीने घरच्या बाप्पासाठी आपल्या कुलदैवत ज्योतिबाच्या मंदिराचा आणि मंदिरालगतच्या परिसराचा देखावा उभारल्याचे पाहायला मिळत आहे. हे सुंदर दृश्य सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा देखावा साकारणाऱ्या व्यक्तीने चैत्र पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या ज्योतिबाच्या यात्रेचा देखावा उभारला आहे. यावेळी ज्योतिबा मंदिरासह आसपासचा परिसरही दाखविण्यात आला आहे. तसेच, मंदिराभोवती पालखीची प्रदक्षिणा, सासनकाठी, गुलाबाची उधळण या सर्व गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत. सध्या या व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत असून, अनेक युजर्स या व्यक्तीचे कौतुक करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @my_islampur या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत तीन दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत.
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
या सुंदर देखाव्याचे कौतुक करीत एका व्यक्तीने लिहिलेय, “कुलदैवत… माझ्या राजाचा असा देखावा खूप भारी. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “कसा बनवला आहे याचापण व्हिडीओ शेअर करा. म्हणजे अजून जे कोणी भक्त असतील, तेपण नक्की ट्राय करतील.” आणखी एकाने लिहिलेय, “दादा एक नंबर डेकोरेशन बनवलं. मस्तच आवडलं आपल्याला. बोला ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.” तर आणखी एकाने लिहिलेय, “अप्रतिम देखावा… जगात भारी!”