Ganpati Visarjan 2024 Emotional Video : दरवर्षीप्रमाणे यंदाही लाडक्या गणपती बाप्पाचे वाजत-गाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गणेशोत्सवाचे ११ दिवस भक्तांनी गणपत्ती बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चा अन् सेवा केली. त्यानंतर ११ दिवसांनी मुंबईतील अनेक मोठ्या मंडळांतील गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”, असा जयघोष अन् ढोल-ताशांच्या गजरात गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पण, ज्या बाप्पाचे आपण ११ दिवस लाड केले. त्याची गुरू म्हणून पूजा केली, सेवा केली, त्याच बाप्पाच्या मूर्तींची विसर्जनानंतर काय अवस्था झाली? तुम्ही याबाबतचे विदारक दृश्य किनारपट्टीवर जाऊन पाहिले का, नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहा. जर तुमची गणपती बाप्पावर श्रद्धा असेल, तर हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
गणपती विसर्जनानंतरचे मनाला चटका लावणारे दृश्य
लाडक्या बाप्पाचे विसर्जनासाठी मुंबईतील सर्वच किनारपट्ट्यांवर दरवर्षी मोठी गर्दी पाहायला मिळते. विशेषत: मुंबईतील गिरगाव चौपाटीवर अनेक मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने ते पाहण्यासाठी केवळ मुंबईच नाही, तर मुंबई बाहेरूनदेखील लोक येत असतात. पण, त्यात गणेशमूर्तींचे विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी काय अवस्था होते हे पाहण्यासाठी तिथे ही गर्दी फिरकतही नाही. पण, या व्हिडीओतील गणेशमूर्तींचे विसर्जनानंतर काय होते किंवा त्या कशा अवस्थेत किनाऱ्यावर पडून असतात याचे दृश्य मन हेलावणारे आहे.
Read More News : Ganesh Chaturthi 2025 : पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी कोणत्या तारखेला साजरी होईल? जाणून घ्या नेमकी तारीख आणि महत्त्व
मुंबईत अनेक गणेशोत्सव मंडळे दरवर्षी एकापेक्षा एक आकर्षक, सुंदर गणेशमूर्ती मंडळात विराजमान करतात. त्यातील अनेक मूर्ती १० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या असतात. इतकेच नाही, तर त्यातील बहुतांश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेल्या असतात. त्यामुळे विसर्जनानंतर त्या समुद्रात लवकर विरघळत नाहीत. अशा परिस्थितीत विसर्जित केलेल्या अनेक गणेशमूर्ती समुद्रातील लाटेबरोबर किनाऱ्यावर वाहत येतात. त्यातील काही मूर्तींचे तर हात, पाय आणि इतर अनेक अवयव तुटलेल्या अवस्थेत दिसून येत असतात. तर कुठे अनेक गणेशमूर्तींचे अवशेष वाळूत रुतलेले दिसतात, असे दृश्य पाहताना खरंच खूप वाईट वाटते.
पण, गणेशमूर्तींची विसर्जनानंतर होणारी ही वाईट स्थिती थांबावी यासाठी दरवर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा पर्यावरणस्नेही आणि मातीच्या मूर्ती तयार करण्याचे आवाहन केले जाते. पण, लोक काही त्यातून बोध घेऊन सुधारण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर दरवर्षी समुद्रकिनारपट्ट्यांवर हे दृश्य पाहायला मिळते.
हे वाईट दिसणारे दृश्य बदलावे म्हणून अनेक सेवाभावी संस्था, कलाकार, राजकारणी मंडळी आणि विविध शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी पुढे येऊन समुद्रस्वस्छता मोहीम राबवतात.