आयपीएलमध्ये आपल्या टीमचे ओझे खांद्यावर घेऊन या स्पर्धेत नाईट रायडर्सचा दबदबा निर्माण करणाऱ्या गंभीरच्या सामाजिक उपक्रमाचे शाहरुख खानने कौतुक केले. गरिबीमुळे होणाऱ्या उपासमारीला आळा घालण्यासाठी गंभीरने मोफत अन्न देण्याचा उपक्रम सुरु केलाय. गंभीरच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. शाहरुखनेही या उपक्रमाबद्दल ट्विटवरुन गंभीरला शुभेच्छा दिल्यात. कॅप्टन तुझा हा उपक्रम कौतुकास्पद असून, मलाही तुझ्यासोबत काम करायला आवडेल, असे ट्विट करत शाहरुखने गंभीरच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. शाहरुखच्या या शुभेच्छांनंतर गंभीरनेही तू सातत्याने माझ्यासोबत आहेस. तुझ्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले, असे रिट्विट केलंय.

टी-२० आणि २०११ च्या विश्वचषकातील भारताच्या विजयात गंभीरचे योगदान अविस्मरणीय असेच आहे. एकेकाळी कामगिरीतील सातत्यपूर्ण खेळीमुळे संघाची मदार सांभाळणारा गंभीर सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय देशांतर्गत रंगणाऱ्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या नेतृत्वाची धूरा सांभाळणारा गंभीर सामाजिक उपक्रमात चांगलाच सक्रिय आहे. गंभीरच्या एका उपक्रमाचे सध्या चांगलेच कौतुक होताना दिसत आहे.
आपल्या खेळीने अनेकांची मनं जिंकणाऱ्या गंभीरने दिल्लीतील पटेल नगरमध्ये गरिबांना मोफत अन्न पुरवण्याचा उपक्रम सुरु केलाय. कोणीही उपाशी झोपू नये, या भावनेतून गंभीरने हा उपक्रम हाती घेतलाय.

एका ट्विटच्या माध्यमातून गंभीरने याउपक्रमाची माहिती दिली. या ट्विटमध्ये ३६५ दिवस, ५२ आठवडे आणि १२ महिने, असा उल्लेख करत या ठिकाणी मोफत अन्न मिळणार असल्याची माहिती त्याने दिली. या उपक्रमासंदर्भात गंभीरने आणखी काही ट्विट केले आहेत. यातील एका ट्विटमध्ये गंभीरनं लिहिलंय की, विश्वचषक जिंकला, आयपीएल जेतेपद जिंकले, प्रतिस्पर्ध्यांना हरवले, आता गरिबीला पराभूत करायचे आहे. गंभीरच्या या उपक्रमावर सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

Story img Loader