राज्यात मागील काही महिन्यांपासून नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव जोरदार चर्चेत आहे. कधी तिच्या लीक होणाऱ्या व्हिडीओंमुळे तर कधी तिच्या कार्यक्रमातील हावभाव आणि नृत्याच्या पद्धतीवरून ती सतत चर्चेत असते. शिवाय काही लोकांनी तर तिच्या चुकीच्या हावभाव करण्यामुळे राज्यातील तरुणाई बिघडत असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर गौतमीचे अनेक चाहते तिचे समर्थन करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर गौतमीचे विरोधक आणि समर्थक असे दोन गट तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण आता गौतमीच्या डान्समुळे नव्हे तर तिच्या पाटील या आडनावामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. सध्या तिच्या पाटील या आडनावावरून मोठा वाद सुरू झाला आहे. त्याचे कारण म्हणजे, मराठा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने गौतमी पाटीलचे कार्यक्रम महाराष्ट्रत न होऊ देण्याचा जाहीर इशारा दिला आहे. “गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही. ती मराठ्यांचे पाटील हे नाव खराब करत आहे,” असे राजेंद्र जराड पाटील यांनी म्हटले होते. त्यांनी गौतमीला दिलेल्या इशाऱ्यामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.

हेही वाचा- गौतमी पाटीलनं मराठा पदाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ इशाऱ्यावर दिलं प्रत्युत्तर; म्हणाली, “मी जर पाटील आहे तर…!”

सोशल मीडियावर तर गौतमीच्या समर्थनार्थ अनेक जण पोस्ट टाकत, एखाद्या कलाकाराला आडनावामुळे धमकी देऊ नये असे म्हणत आहेत. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील गौतमीच्या समर्थनार्थ एक पोस्ट टाकली आहे. आता काही मराठा संघटनांनी गौतमीचे समर्थन केल्याचे समोर आले आहे. गौतमीने सादर केलेल्या नृत्यावर केवळ आडनावावरून आक्षेप घेण्यात आल्याचा निषेध जळगावमधील मराठा सेवा संघाने केला आहे. शिवाय गौतमीच्या आडनावामुळे मराठा समाजाची बदनामी होते, हे आपणाला पटत नसून आपण गौतमीच्या पाठीशी असल्याचे व्यक्तव्य मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील यांनी केले आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही पाहा- गौतमी पाटीलनं भर कार्यक्रमात फॅनला स्टेजवरच केलं kiss, व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

या वेळी पाटील म्हणाले, “जेव्हा माधुरी दीक्षित नृत्य करायची, तेव्हा कोणत्याही दीक्षितांनी तिला विरोध केला नाही. तर गौतमीच्या पाटील आडनावावरून आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. तसेच जर आक्षेपच घ्यायचा असेल, विरोध करायचा असेल तर मराठा समाजाच्या मुलांनी तिचे कार्यक्रम पाहायला जाऊ नये, तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये. मात्र तिला धमकी देणे अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचे आहे.” दरम्यान, जळगावमधील मराठा सेवा संघाच्या भूमिकेमुळे मराठा संघटनांमध्येच दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami patil threaten over surname maratha seva sangh compares madhuri dixit controversy after gautami patil viral video jap