सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये असलेल्या असनिये गावात एका रिक्षेला जंगली प्राणी गवा रेड्याने रविवारी रात्री धडक देत रिक्षा उलटून टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे ग्रामीण भागात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वनक्षेत्रपाल मदन शिरसागर यांनी नागरिकांना घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. तसेच ही घटना केरळ किंवा कर्नाटकातील असावी, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा – “…त्यापेक्षा मोदी-शाहांचं हस्तक असणं चांगलं”; ‘सामना’तील टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
गवा रेडा रिक्षाला ठोकर देऊन ती उलटून टाकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांची नावे टाकून फिरवला जातो आहे. त्यामुळे जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन शिरसागर यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, ” या परिसरात गवा रेडाने कोणतीही रिक्षा उलटून टाकलेली नाही. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, हा व्हिडिओ केरळ किंवा कर्नाटक राज्यातील असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जंगली प्राणी गवा रेड्याचा कळप ठिकठिकाणच्या शेतात वावरत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. तसेच मार्ग मोकळा झाल्यावर गवा रेड्यांचा कळप दुसरीकडे जातात, तेव्हा वाहनांचे अपघात होत आहेत. शेतकऱ्यांकडे शेती संरक्षण बंदूक असायची. त्यामुळे शेती-बागायती संरक्षण करण्यासाठी शेतीवर माच घालून शेतकरी वन्य प्राणी पळवून लावायचे. मात्र, मागील दोन तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी आडमुठे धोरण राबवले आहे. त्यामुळे बंदूक परवाने नुतनीकरण झाले नाहीत. लोकप्रतिनिधींनीदेखील याकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी नाराज झाले आहेत.