शिक्षणाला वयाचं बंधन नसतं असं म्हटलं जातं. आपण कोणत्याही वयामध्ये ज्ञान मिळवू शकतो. थोरामोठ्यांनी शिक्षणाबद्दल सांगितलेल्या या गोष्टी आपण अनेकदा ऐकत आलो आहोत. जॉर्जियामध्ये वास्तव्याला असणाऱ्या सॅम कॅप्लान या ७२ वर्षाच्या आजोबांनी ‘शिक्षणामध्ये वय मध्ये येत नाही’ हे वाक्य खरं करुन दाखवलं आहे. ज्या वयात लोक थकून जातात, अशा वयात ते पदवीधर झाले आहेत. विशेष म्हणजे सॅम यांच्या पदवी प्रदान समारंभाला त्यांची ९८ वर्षीय आई उपस्थित राहिली होती. या खास प्रसंगी ते दोघेही प्रचंड भावूक झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सॅम कॅप्लान हे जॉर्जियामधील लॉरेन्सविले या ठिकाणी राहतात. त्यांनी ग्विनेट कॉलेजमधून ‘सिनेमा अन्ड मीडिया आर्ट्स’ या विषयामध्ये पदवी मिळवली. गुरुवारी त्यांच्या महाविद्यालयामध्ये दीक्षांत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला ते आपल्या आईसह हजर राहिले होते. तेव्हापासून सोशल मीडियावर सॅम कॅप्लान या नावाची चर्चा होत आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सॅम म्हणाले, “मी १९६९ मध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर माझं शिकणं थांबलं. मध्यंतरी गाडी चालवताना रेडिओवर एक बातमी ऐकली. त्यामध्ये एका महाविद्यालयाचा उल्लेख होता. या महाविद्यालयामध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी वयाचे बंधन नसल्याचे रेडिओवर सांगितले गेले होते. तेव्हा मी तब्बल ५० वर्षांनंतर पदवी मिळवण्याचा निर्णय घेतला.”

आणखी वाचा – ‘मुंबईचा वडापाव’ जगात भारी, राजदूत एरिक गार्सेटींनाही वडापावची भुरळ! म्हणाले…

ते पुढे म्हणाले, “आमच्या कुटूंबामध्ये एकही व्यक्ती पदवीधर नसल्याचे खंत मला सलत होती. २०१९ मध्ये मी ग्विनेट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि चार वर्षांनी मला माझ्या आवडत्या विषयामध्ये पदवी मिळाली. मला लिहायची-वाचायची आवड आहे. मला लेखन करायचे होते. कॉलेजमध्ये सुरुवातीला मी नर्व्हस होतो. पण मी ही गोष्ट आव्हानासारखी स्विकारली. हा प्रवास रोमांचक होता. मला ही गोष्ट पूर्ण केल्याने स्वत:बद्दल गर्व वाटत आहे.” सॅम कॅप्लान यांची ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या उदाहरणावरुन आपण ठरवलं तर काहीही करु शकतो असे नेटकरी म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Georgia man 72 graduates college with his 98 year old mother in attendance know more yps
Show comments