Georgia Meloni With Narendra Modi G7 Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर लगेचच गुरुवारी रात्री जी ७ परिषदेसाठी इटलीला पोहचले. जगभरातील विविध देशांच्या पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षांसह मोदींनी सुद्धा जी ७ परिषदेत सहभाग घेतला. यावेळी मोदींनी तंत्रज्ञानातील मक्तेदारी मोडीत काढण्यासह एआयच्या क्षेत्रात जागतिक सुशासनासाठी भारताने घेतलेल्या भूमिका मोदींनी या परिषदेत मांडल्या. एकीकडे हे गंभीर व महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले असले तरी सध्या सोशल मीडियावर मोदी व मेलोनी यांच्या भेटीचीच जास्त चर्चा होत आहे. वर म्हटल्याप्रमाणे जी ७ परिषद ही इटलीत होत असल्याने यजमान देशाच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आलेल्या नेत्यांचे स्वागत केले. मेलोनी यांनी नमस्कार करत सगळ्यांचं केलेलं स्वागत सुद्धा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेणारा मुद्दा ठरला आणि आता तर स्वतः मेलोनी यांनी आपल्या X अकाउंटवर मोदींसह व्हिडीओ पोस्टकरून नेटकऱ्यांना चर्चेचा तयार मुद्दाच काढून दिला आहे. मीमकरी जिंकले अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम व X तिन्ही ठिकाणी तुफान व्हायरल होतोय. नेमकं असं या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये घडलंय तरी काय, पाहूया..
आज, शनिवारी सकाळी मोदी व मेलोनी यांचा सेल्फी घेत असतानाचा एक फोटो अगोदरच व्हायरल झाला होता. यावेळी मेलोनी या सेल्फी कॅमेराने व्हिडीओ काढत होत्या हे नंतर समोर आलेल्या व्हिडीओमधून स्पष्ट होते. मेलोनी पुढे उभ्या आहेत तर त्यांच्या मागे मोदी सुद्धा हॅलो म्हणत उभे आहेत. इतक्यात मेलोनी म्हणतात, “हॅलो फ्रॉम द मेलोडी टीम”. तुमच्या माहितीसाठी जी २० शिखर परिषदेच्या वेळी जेव्हा मेलोनी भारतात आल्या होत्या तेव्हा मोदी व मेलोनी यांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते, त्यांच्यातील हलके फुलके क्षण पाहून नेटकऱ्यांनी अनेक मीम्स बनवले होते त्यातीलच एक भाग म्हणजे मोदी व मेलोनी या नावांना एकत्र करून बनवलेला मेलोडी हा हॅशटॅग. काही महिन्यांपूर्वी जेव्हा मोदी व मेलोनी यांची पुन्हा भेट झाली होती तेव्हा सुद्धा स्वतः जॉर्जिया मेलोनी यांनी #मेलोडी असे कॅप्शन देत त्या दोघांचा एक सेल्फी शेअर केला होता. तेव्हाच आपले मीम्स स्वतः इटलीच्या पंतप्रधानांनीही पाहिलेत असं म्हणत नेटकऱ्यांनी गंमतीत आणखी पोस्ट शेअर केल्या होत्या. आणि आता तर मेलोनी यांनी स्वतः थेट हॅलो फ्रॉम मेलोडी म्हणत मीम्स बनवणाऱ्यांना खुश केले आहे.
जॉर्जिया मेलोनी व मोदींचा Video व्हायरल
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जी ७ परिषदेतील फोटो शेअर करताना मेलोनी यांच्यासह असलेला फोटो सर्वात आधी शेअर केला होता. मोदींच्या या पोस्टखाली इन्स्टाग्रामवर ४५ मिनिटांत १२ हजारहून अधिक कमेंट्स आल्या होत्या व त्यातील अर्ध्याहून जास्त कमेंट्समध्ये #melodi ट्रेंड दिसत होता.
हे ही वाचा<< Melodi विसरा, जॉर्जिया मेलोनी यांच्या मोबाईल कव्हरचीच तुफान चर्चा! लिहिलेले ‘हे’ गुप्त संदेश पाहिलेत का?
यावरून बाकी काहीही संकेत नसला तरी हे मात्र नक्कीच स्पष्ट होते की आतापर्यंत नेटकऱ्यांनी आपली भन्नाट क्रिएटिव्हिटी या दोन्ही नेत्यांपर्यंत नक्कीच पोहोचली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रेंड पकडून चर्चेत राहण्याचा हा फंडा सुद्धा त्यांनी ओळखला आहे.