पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळ्यात घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यायची असते. पावसाळ्यात रस्त्यात खड्डे पडतात. खड्ड्यांमुळे अनेकदा पाय घसरुन अनेकजण पडतात. लोकांना पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकदा पडल्याच्या घटना घडल्या आहेत. आजही देशभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे चांगले रस्ते तयार केलेले नाहीत. नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरतं काम केलं जातं, पण हे रस्ते काही दिवसांमध्येच मोडळीस येतात. अन् याचिच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे.

पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने खड्डे शोधणे अवघड होऊन बसते, त्यामुळे काही वेळा मोठे अपघातही होतात. अशीच घटना मध्य प्रदेशात घडली आहे. येथे रस्त्यावर काम सुरु आहे. याच रस्त्यावरुन पावसात घरी जात असताना एक मुलगी घसरुन खड्डयात पडली. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महापालिकेच्या दुर्लक्षामुळे एका मुलीचा जीव टांगणीला आला होता. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…

इंदूरच्या प्रभाग क्रमांक एकच्या गल्लीत हा खड्डा खोदण्यात आला. पावसामुळे हा खड्डा पाण्याने संपूर्ण भरला. खड्ड्यांमुळे संपूर्ण रस्ताच बंद झाल्याने अशा लोकांना बाजुने ये-जा करण्यासाठी धोका पत्करावा लागला. ही घटना घडली तेव्हा एक महिला आपल्या मुलीसह हा खड्डा ओलांडत होती. पाणी पाहून मुलीने त्यात पाय टाकला, त्यानंतर मुलीचा तोल गेला आणि ती खोल खड्ड्यात पडली.

(हे ही वाचा: मुंबईच्या स्टोअरमध्ये पावसापासून वाचण्यासाठी भटक्या कुत्र्याने घेतला आसरा, हृदयस्पर्शी Video पाहताच रतन टाटांचे होतेय कौतुक)

खड्ड्यात पडताच मुलगी पूर्णपणे बुडाली. हे आईच्या लक्षात आले असता त्यांनी आरडाओरड केलं पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. दरम्यान, एक अल्पवयीन मुलगा तेथे पोहोचला आणि मुलगी बुडत असल्याचे पाहून त्याने तिला बाहेर काढले. सुदैवाने मुलीचा जीव वाचला. मदतीसाठी मूल तेथे पोहोचले नसते तर मुलीला जीव गमवावा लागला असता.

ही बाब चंदन नगरमधील अंबर नगर येथील असल्याची माहिती आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, घटनेच्या वेळी एक व्यक्तीही तिथे उपस्थित होता पण त्याने संपूर्ण घटनेकडे दुर्लक्ष केले. मात्र, अल्पवयीन बालक तेथे पोहोचला आणि मुलीचे प्राण वाचवले.

येथे पाहा व्हिडिओ

ऐन पावसाळ्यात महापालिकेने एवढा धोकादायक खड्डा का खोदला आहे, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. आणि ते खोदले असेल तर सुरक्षिततेबाबत चेतावणी देणारे फलक का लावले नाहीत? मुलीला जीव गमवावा लागला असता तर जबाबदार कोण?, अशाप्रकारचे प्रश्न आता लोकांनी निर्माण केले आहेत.