‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण तुम्ही सर्वांनी ऐकली असेल. पण, याचे जिवंत उदाहरण मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे. जिथे भरधाव वेगात आलेल्या कारने मुलीला जोरदार धडक दिली व ती काही अंतरावर जाऊन पडली. हा क्षण इतका भयावह होता की, हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकालाच धक्का बसला. हा काळजाचा थरकाप उडविणारा व्हिडीओ व्हायरल होतोय. आश्चर्याची बाब म्हणजे, एवढ्या जोरदार धडकेनंतरही मुलगी सुरक्षित असल्याची माहिती आहे.

नेमके काय घडले?

हा व्हिडीओ औबेदुल्लागंज अर्जुननगर पुलाच्या सर्व्हिस रोडचा असल्याचे सांगण्यात येत आहे, जिथे मुलगी अचानक गाडीसमोर धावत आली. त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मुलीला जोरदार धडक दिली. टक्कर इतकी जोरदार होती की, मुलगी काही अंतरावर पडली. गाडीचालक काही वेळ थांबला, पण तिथे उपस्थित लोकांचा संताप पाहून तो पळू लागला. यावेळी कारचे चाक दोन वेळा मुलीच्या अंगावरून गेले. स्थानिकांनी कारचालकाला रोखण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, कारचे चाक दोनवेळा मुलीच्या अंगावरून जाऊनही ती सुरक्षित आहे. सुदैवाने या घटनेत मुलीचे प्राण वाचले आहेत. मुलीला वाचवण्यासाठी स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तो पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा : तुम्हीही धावता जिना चढ-उतार करताय? ‘ही’ छोटीशी चूक घेऊ शकते जीव; प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच )

हा व्हिडीओ X वर तुषार राय नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. एका युजरने कमेंट केली की, “मुलीने अशा प्रकारे रस्त्यावर धावू नये, कारण असे अपघात होतात.” दुसर्‍याने लिहिले की, “मुलगी सुरक्षित आहे यासाठी आम्ही देवाचे आभार मानतो.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिले की, “व्हिडीओ पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसत आहे की मुलीची चूक होती.” चौथ्या व्यक्तीने लिहिले की, “आपल्या मुलांना अशा प्रकारे रस्त्यावर सोडणाऱ्या पालकांचाही दोष आहे.”

येथे पाहा व्हिडिओ

आणखी एकाने लिहिले की, व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटते की, “ही कारचालकाची चूक आहे, तर ती मुलीची चूक आहे, तिने असे पळायला नको होते.” एकाने लिहिले की, “घटनेनंतर मुलीला रुग्णालयात नेले पाहिजे होते, कारचालकाला पकडण्यासाठी वेळ घालवायला नको. अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया या व्हायरल व्हिडीओवर लोकांनी दिल्या आहेत.