लिंबो स्केटिंग हा स्केटिंगमधला सर्वात अवघड प्रकार समजला जातो. दोन पाय समांतर होतील एव्हढ्या खाली वाकून एका आडव्या बारखालून जावं लागतं. यात महाराष्ट्राच्या १६ वर्षीय चिमुरडीने लिंबो स्केटिंगमध्ये महारथ मिळवत नवा जागतिक विक्रम रचलाय. नागपुरच्या सृष्टी शर्मा हिने हा जागतिक विक्रम रचतानाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
नागपुरच्या उमरेडसारख्या छोट्या गावात जन्मलेल्या १६ वर्षीय सृष्टी शर्मा हिने लिंबो स्केटिंग प्रकारात आतापर्यंत एक नव्हे, दोन नव्हे तर पाचव्यांदा ‘गिनीज बुक’मध्ये आपलं नाव नोंदवून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीचा व्हिडीओ ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. “सृष्टी धर्मेंद्र शर्मा हिचा अंडर-10 बार लिंबो स्केटिंग प्रकारात सर्वात वेगवान वेळेची नोंद” अशी कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.
आणखी वाचा: अक्षय कुमारनेही कौतुक केलेल्या ‘त्या’ पोलिसाने उलगडलं रहस्य; नवा व्हिडीओ व्हायरल
View this post on Instagram
वयाच्या चौथ्या वर्षी स्केटिंगला सुरुवात करणाऱ्या सृष्टीने जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवत थेट गिनीज बुक गाठले. ते ही एक दोनदा नव्हे तर पाच वेळा. २०१४ मध्ये अवघ्या तीन वर्षांत १० मीटरमध्ये वेगवान लिंबो स्केटिंग करून सृष्टीने पहिल्यांदा गिनीज बुकमध्ये आपल्या नावाचा समावेश केला. त्यानंतर २०१५ मध्ये २५ मीटरमध्ये, २०१७ साली गुरुग्राम येथे २० मीटरमध्ये आणि २००२ मध्ये पुन्हा कामगिरीची पूनरावृत्ती करून आपल्यातील टॅलेंट जगाला दाखवून दिले. असा पराक्रम करणारी सृष्टी नागपूर व विदर्भाची पहिली महिला स्केटर ठरली आहे.
नागपुरच्या या चिमुरडीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी मंडळी कमेंट्चा अक्षरशः पाऊस पाडत महाराष्ट्राच्या या मुलीचं कौतुक करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अवघ्या आठ तासांमध्येच ७६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सृष्टी शर्मा हिने मिळवेल्या या प्रसिद्धीचा वापर ती ‘सेव्ह द गर्ल चाइल्ड’ या मोहिमेसाठी करतेय.