Girl Records Reel of street fight | Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओंचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी लोक कुठल्याही थराला जाऊन पोहोचतात. सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म खरं तर कलाकौशल्यं दाखविण्यासाठी असला तरी कित्येक जण याचा सर्रास गैरवापर करताना दिसतात.
व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी लोक असंवेदनशील झाले असून, अनेकदा ते आपली मर्यादा ओलांडताना दिसतात. व्ह्युजच्या नादात कोणाच्या भावना दुखावल्या जात नाहीयेत ना याचीही काळजी ते घेत नाहीत. असाच एक असंवेदनशील व्हिडीओ सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ (Girl Records Reel of street fight Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक मुलगी इन्स्टाग्रामसाठी रील शूट करताना दिसली. त्यामुळे अनेकांनी तिच्या हेतूबाबत शंका घेतल्या आहेत.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एका ठिकाणी रस्त्याच्या अगदी मधोमध काही तरुण-तरुणी भांडताना दिसतायत. अगदी एकमेकां झिंज्या उपटेपर्यंत हे भांडण भररस्त्यात सुरू आहे. आजूबाजूला काही माणसंही गोळा झाली आहेत.
भांडण अतिशय टोकाला जातंय हे कळल्यावर काही माणसं तो वाद मिटवायलाही गेली. परंतु, हे सगळं सुरू असताना एक इन्फ्लूएन्सर फक्त तमाशा पाहत उभीच राहिली नाही, तर तिनं चक्क या भांडणाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि त्याचा वापर आपल्या रीलसाठी केला. एवढंच नाही, तर भांडण पाहताना ती चक्क हसत होती.
युजर्सचा संताप (Girl Records Reel of street fight Users Comment)
‘Nikhil saini’ या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. “गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये, शिमला रिज हे क्रिंज गोष्टींसाठी एक हॉट स्पॉट बनले आहे. रील करणाऱ्यांनी या जागेचा ताबा घेतला असून, येथे दररोज असे फालतू व्हिडीओ शूट केले जातात. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी भांडणाच्या वेळी रील बनविताना दिसत आहे. भांडण थांबविण्याऐवजी ती या वादाचा कन्टेन्ट म्हणून वापर करीत आहे. एक स्थानिक प्रशासनाला विनंती करतो की, अशा लोकांविरुद्ध कठोर कायदे करावेत आणि आमच्या सार्वजनिक ठिकाणांचे रक्षण करावे”, असं कॅप्शन या युजरनं पोस्टला दिलं आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिच्या या असंवेदनीय वागण्यावर संताप व्यक्त केला आणि तिला ट्रोलदेखील केले. “हे खूप असंवेदनशील आणि दयनीय आहे. दुर्दैवानं अशा लोकांसाठी कायदादेखील काहीही करू शकत नाही”, अशी कमेंटही एका व्यक्तीनं केली. तर, एकानं हिमाचल पोलीस, डी.सी. शिमला यांना टॅग करून लिहिले, “आपणास विनंती आहे की आमच्या सार्वजनिक ठिकाणांचे रक्षण करावे.”