आपल्याला केलेल्या मदतीची जाण ठेवत त्याची परतफेड करणारा व्यक्ती विरळाच…मात्र याचा प्रत्यय मुंबईतील एका कॅबचालकाला नुकताच आला…मुंबईत मागील आठवड्यात झालेल्या तुफान पावसामुळे नागरीकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले, शिखा चावला ही त्यातीलच एक तरुणी…पावसामुळे मुंबईतील जवळपास सर्व वाहतूक सेवा कोलमडल्या होत्या. यावेळी आपल्याला मदत केलेल्या कॅबचालकासाठी तीने मदतीचा हात पुढे केला आहे.
२९ ऑगस्ट या दिवशी मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. अनेक कार्यालयांतील लोकांना दुपारीच घरी सोडून देण्यात आले. त्यावेळी शिखा दुपारी ३ वाजता दक्षिण मुंबईतील ऑफीसमधून निघाली. अंधेरीला घरी जाण्यासाठी वाहनाच्या शोधात असताना तिला एक कॅब दिसली. ही मुलगी वाहनाचा शोध घेत असल्याचे एका कॅबचालकाच्या लक्षात आले आणि त्याने तिला मदतीसाठी विचारणा केली. यावेळी त्याच्यासोबत त्याचा एक नातेवाईकही कॅबमध्ये होता. आपल्याला अंधेरीला जायचे आहे सांगत शिखा टॅक्सीत बसली, त्यावेळी ती घरी कसे पोहोचणार या चिंतेतच होती.
मात्र कॅबचालकाने या मुलीला तुम्ही काळजी करु नका. काहीही झालं तरी मी तुम्हाला नीट घरी सोडेन असं आश्वासन दिलं होतं. इतकंच नाही तर घरच्यांना तुम्ही सुरक्षित असल्याचं कळवत राहा असंही तो शिखाला सांगत होता. या संपूर्ण प्रवासात आता आपण पुढे जाऊ शकत नाही, तुम्ही दुसरी सोय बघा असं एकदाही म्हटला नाही. कॅबचालकाच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच असेही शिखाला वाटले. दुपारी ३ वाजता सुरु झालेला त्यांचा प्रवास ५ ते ६ तासांनी संपला. रस्त्यात येणारे अडथळे पार करत ते अखेर ८.३० वाजता अंधेरीला पोहोचले.
या सगळ्या प्रसंगानंतर शिखाने आपल्या फेसबुक वॉलवर या चालकाचे आभार मानणारी पोस्ट लिहीली. इतकेच नाही तर कॅबमध्ये त्यादिवशी असलेल्या कॅबचालकाच्या नातेवाईकासाठी नोकरी शोधण्याचे आवाहन आपल्या मित्रमैत्रीणांना केले. कॅबचालकाचा नातेवाईक विशीत असताना त्याच्या गावात कॉम्प्युटर शिक्षक म्हणून काम करत होता, तर आता तो मुंबईमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून नोकरीच्या शोधात आहे. शिखाने आपल्या पोस्टमध्ये या व्यक्तीने नाव आणि मोबाईल नंबरही शेअर केला आहे. जेणेकरुन कुठे संधी असल्यास ते लोक थेट त्याच्याशी संपर्क करु शकतील. अनेकांनी शिखाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या असून कॅबचालकाच्या नातेवाईकाला मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.