देशात कुठेही आपत्ती आली तरी शेवटचा आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून भारतीय लष्कराला मदतीसाठी बोलावलं जातं. काश्मीरमधील पूर असो वा उत्तराखंडमधील बर्फवृष्टी किंवा नुकतेच गुजरातमध्ये आलेले बिपरजॉय चक्रीवादळ या सर्व ठिकाणी भारतीय लष्कर मदतकार्यात आघाडीवर असते. तर भारतीय लष्कराचा एक सैनिक शंभरांवर भारी पडतो असंही म्हटलं जाते. याचेच एक ताजे उदाहरण चंदीगडमधून समोर आले, जेथे एका भारतीय लष्कराच्या जवानाने खोल कालव्यात बुडणाऱ्या मुलीला जीवाची पर्वा न करता वाचवलं आहे.
एएनआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये भारतीय लष्करातील जवान डीएन कृष्णन यांना एक मुलगी पाण्यात बुडताना दिसली आणि त्यांनी लगेच कालव्यात उडी मारून मुलीला बाहेर काढले आणि तिचा जीव वाचवला.
सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक या लष्करी जवानाचे कौतुक करत आहेत. चंदीगडच्या संरक्षण पीआरओने सांगितले की, भारतीय लष्कराच्या जवानाने मुलीला कालव्यातून बाहेर काढून तिचे प्राण वाचवले असून सध्या ती मुलगी सुखरुप आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी या जवानाचं कौतुक केलं आहे.