प्रत्येकाचं आयुष्य किती वेगळं असतं नाही? काहीजणांना अनेक गोष्टी सहजपणे मिळत जातात तर अनेकांना त्यासाठी काबाडकष्ट करावे लागतात. पण कुठल्याही भौतिक सुखांपेक्षा एका लहान मुलाला हवी असते ती त्याच्या आईवडिलांच्या मायेची सावली.
पण या साध्या गोष्टीच्या बाबतीतही काही मुलांच्या जीवनात अनेक अडचणी येत राहतात. पालकांचा घटस्फोट किंवा अशा गोष्टींमुळे त्या मुलांना आईच्या किंवा वडिलांच्या मायेला पारखं रहावं लागतं.
आपल्या मुलाला एकट्याच्या हिमतीवर वाढवणाऱ्या आई किंवा वडिलांना तारेवरची मोठी कसरत करावी लागते. त्या मुलाच्या आयुष्यात उपस्थित नसलेल्या पालकाची भूमिकाही त्यांना बजवावी लागते. आणि अशाच वेळी नात्यांचा खरा कस लागतो.
सिंगल पेरेंटिंग किंवा एकल पालकत्वाच्या बाबतीत स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अनेकदा सहानुभूतीचा असतो आणि तो तसा असावाही. पण एखादा पुरूष सिंगल पेरेंट असेल तर विचित्ररीत्या ही सहानुभूती फारशी दाखवली जात नाही.
याच कारणामुळे या मुलीने लहानपणापासून एकाकी झुंज देत मायेची पखरण करणाऱ्या आपल्या बाबांना फेसबुकवर लिहिलेलं हे पत्र हजारोंना खूप भावलंय आणि त्यामुळे ते व्हायरल झालंय.
‘सिंगल पेरेंट असलेल्या बाबांना अनेकदा समाजाकडून सहानुभूती मिळत नाही. माझ्या बाबांचंही तसंच झालं. पण लहानपणापासून मला माया देत मला कशाचीही कमतरता भासू न देणारे माझे बाबा ‘चॅम्प’ आहेत. माझ्या आजवरच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात ते ठामपणे माझ्या मागे उभे राहिले आणि मला आईची कमतरता भासू दिली नाही. मेकअप करणं, खरेदी करणं यासारख्या ‘बायकी’ समजल्या जाणाऱ्या गोष्टींमध्येही ते माझ्यासोबत आनंदाने सहभागी झाले. माझ्या आयुष्यतल्या प्रत्येक वळणावर त्यांनी मला खंबीर साथ दिली. आणि म्हणूनच आज मला जाहीरपणे म्हणावंसं वाटतंय की ‘थँक्यू बाबा’ तुम्ही खरोखरचे ‘चॅम्प’ आहात.’
या पत्राच्या शब्दाशब्दातून आपल्या बाबांविषयी असणारी या मुलीच्या माय़ा स्पष्टपणे दिसतेय. तिने फेसबुकवर टाकलेलं संपूर्ण पत्र वाचण्यासाठी खाली क्लिक करा
सौजन्य- फेसबुक
फोटोमधल्या या बाबांसारखंच जीवनाशी एकाकी झुंज देणाऱ्या जगभरातल्या एकल आई किंवा बाबांना त्याचप्रमाणे त्यांचे कष्ट जाणून घेत त्यांच्या मायेला प्रतिसाद देणाऱ्या त्यांच्या मुलामुलींना मनापासून सलाम!