पावसाळ्यात समुद्रकिनारी जाऊ नका, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. कारण- अशा वेळी अपघात होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, तरीही काही अतिउत्साही लोक जीव धोक्यात घालून, कसलाही विचार न करता समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असतात. अशाच प्रकारे एक जोडपे भरपावसात समुद्रातील उंच लाटांमध्ये उभे राहून रोमान्स करीत होते. यावेळी एक उंच लाट आली आणि पुढे जे काही घडले ते फारच भयानक होते. या धडकी भरविणाऱ्या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

समुद्रात वादळ सुरू असताना मध्यभागी उभे राहून दोघेही आनंदात रोमान्स करीत होते. यादरम्यान अशी काही एक उंच लाट आली आणि प्रियकराच्या डोळ्यांसमोर त्याच्या प्रेयसीला समुद्रात ओढून घेऊन गेली. ही दुर्घटना रशियातील सोची येथील असल्याचे सांगण्यात येत आहे: जी तिथे लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपे समुद्राच्या लाटांमध्ये चालत आहे. यावेळी समुद्रात उंचच उंच लाटा उसळताना दिसतायत. दोघांनी एकमेकांचा हात धरला होता आणि दोघे समुद्राच्या लाटांसमोर उभे राहून रोमान्स करू लागले. याचदरम्यान समुद्रात एक उंच लाट उसळली. त्यात प्रियकराने स्वत:ला सावरले आणि तो बाहेरही पडला; पण त्याच्या प्रेयसीला लाटांमध्ये तोल सांभाळता आला नाही; ज्यामुळे ती लाटांमध्ये वाहत समुद्रात ओढली जाऊ लागली. यावेळी आणखी एक व्यक्ती त्यांच्या मदतीला धावून आली; पण तोपर्यंत प्रेयसी समुद्रात ओढली जाऊन दिसेनाशी झाली होती. तिचा प्रियकर समुद्रांच्या लाटांमध्ये वारंवार प्रेयसीचा शोध घेतो; पण ती कुठेही दिसत नाही.

फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात बॉडी दाखवत वाटत होता बिअर; video व्हायरल होताच आता हात जोडून मागतोय माफी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेस्क्यू टीम तीन दिवसांपासून मुलीचा शोध घेत होती; मात्र तिच्याबद्दल कोणतीही अपडेट देणारी माहिती समोर आलेली नाही. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “तुम्हाला पोहायला येत असले तरी लाटा तुम्हाला समुद्रात ओढून घेऊन जातील.”

दुसऱ्या युजरने म्हटले, “शक्तिशाली समुद्रात गेल्यानंतर कधी कधी चांगले जलतरणपटूही बुडू शकतात. यात पोहण्याचे कमी ज्ञान असलेल्या जलतरणपटूंची जगण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते.” तिसऱ्या युजरने लिहिले, “किती भयानक. मी यापूर्वी असे कधीही पाहिले नव्हते. मला असे वाटते की, प्रियकराने तिला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला नाही.” चौथ्या एका युजरने लिहिले, “तो तिला सुरुवातीपासूनच पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत होता; पण तिने ऐकले नाही.”