राज्यातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना 1 जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 23 टक्के वाढ होईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यातील 20 लाख 50 हजार कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना पगारवाढ मिळणार आहे. मात्र एका शिक्षकाने सातवा वेतन आयोग नाकारत शेतकऱ्यांकडे लक्ष द्या असं साकडं सरकारला घातलं आहे. किरण खरैनार असं या शिक्षकाचं नाव असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

किरण खैरनार नगर जिल्ह्यातील समनापुर येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. किरण खैरनार यांनी साधारण पंधरा दिवसापुर्वी भूमिपुत्र शेतकरी संघटनेमार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. मात्र सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याची चर्चा सुरु आहे.

‘सातत्याने पडणारा दुष्काळ, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या मला बैचेन करुन टाकत आहेत. त्यामुळे मला सातवा वेतन आयोग नको, पण आधी शेतकऱ्यांकडे पाहा’, अशी विनंती किरण खैरनार यांनी पत्रात केली आहे. किरण खैरनार यांचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किरण खैरनार यांनी पत्रात शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

‘मी एक शेतकरी कुटूंबातील आहेत. वीस वर्षाच्या नोकरीच्या काळात दोन वेतन आयोग मिळालेत. त्यातून मिळणाऱ्या पैशात सर्व गरजा भागवून पगार उरतो. त्यामुळे मला सातवा वेतन आयोग नको’, असं किरण खैरनार यांनी पत्रात लिहिलं आहे.

‘राज्यातील इतर गोष्टींवर खर्च करताना प्रथम प्राधान्याने शेतकरी कर्जमुक्ती, शेतमालाला दर मिळावा, दुष्काळी मदत देण्याला प्राधान्य द्यावे. एकवेळ वेतन आयोग नाही मिळाला किंवा उशिरा मिळाला तरी चालेल, मात्र रक्ताचे थेंब अश्रुत मिसळून जगण्याची धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांना जगवलं पाहिजे’, अशी भावना किरण खैरनार यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

शेतकरी जगला, तरच समाज जगेल. त्याच भावनेतून मी सातवा वेतन आयोग देण्याआधी शेतकऱ्यांकडे पाहण्याबाबत विनंती करणारे पत्र दिले आहे असं किरण खैरनार यांनी सांगितलं आहे.

Story img Loader