पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विविध देशांमध्ये काही ना काही उपाय करण्यात येतात. प्लास्टिकचा वाढता वापर ही सध्या अनेक देशांमधील मोठी समस्या आहे. इंडोनेशिया हा प्लास्टिकच्या वापरामध्ये चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. येत्या काळात हे प्रमाण असेच वाढत राहीले तर पर्यावरणाचे आणखी नुकसान होईल. यावर उपाय म्हणून इंडोनेशियाच्या सरकारने एक अनोखा उपाय शोधून काढला आहे. त्यांनी एक नवा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये तुम्हाला सार्वजनिक बसने प्रवास करायचा असल्यास तुम्हाला तिकीट काढण्याची गरज नाही. तुम्ही घरातील प्लास्टिकच्या बाटल्या दिल्यास तुम्हाला एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाता येणार आहे.
प्रवाशांच्यादृष्टीनेही ही गोष्ट अतिशय आनंदाची असून केवळ बाटल्या देऊन प्रवास करता येणार असल्याने त्यांचे पैसे वाचणार आहेत. याशिवाय त्यांच्याघरातील प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचराही बाहेर जाणार आहे. विशेष म्हणजे बसमध्ये जमा केलेल्या बाटल्या ठेवण्याची व्यवस्था या बसमध्ये करण्यात आली आहे. बाटल्यांची झाकणे आणि कव्हर काढून त्या कंपनीला विकल्या जातात. या कंपन्या त्याचा पुर्नवापर करतात. विशेष म्हणजे यासाठी लिलाव करुन कंपन्यांकडून पैसे घेतले जातात. हे पैसे बसच्या खर्चासाठी वापरण्यात येतात. २ तासांच्या प्रवासासाठी १० प्लास्टिकचे कप किंवा पाच रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या द्याव्या लागतात. २०२० पर्यंत देश प्लास्टिकमुक्त बनविण्याचे आव्हान असल्याचेही इंडोनेशियाने नुकतेच स्पष्ट केले आहे. एका बसमध्ये दिवसाला २५० किलो बाटल्या जमा होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार पुढील दोन दशकात प्लास्टिकचा वापर दुपटीने वाढण्याचे संकेत प्रत्यक्षात उतरल्यास पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढासळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. प्लास्टिक कचऱ्यामध्ये बाटल्या आणि पिशव्यांचे प्रमाण अधिक आहे. बाटलीबंद पाणी आणि भाजीपाल्यासह इतर किरकोळ वस्तुंसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे कचरा वाढतोय. गेल्या साडेचार दशकात या दोन्ही वस्तुंचा वापर जवळजवळ ६२० टक्क्यांनी वाढला आहे. बाटल्या आणि पिशव्यांच्या निर्मितीत चीन आघाडीवर असून त्यानंतर इंडोनेशियाचा क्रमांक लागतो, असेही या अहवालात म्हटले आहे.