अगदी काही महिन्यांपूर्वीच विविध विमान वाहतूक कंपन्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे स्वस्तात तिकिटे देण्याचा सपाटाच लावला होता. या सवलतीचा फायदा घेऊन अनेकांनी आपल्या पर्यटनाचे नियोजन केले. त्यापैकी काहीजण फिरून आले देखील. तर काहीजण निघण्याच्या तयारीत आहेत. पण या संधीचा तुम्ही फायदा घेतला नसेल, तर तुमच्यासाठी गोएअरने स्वस्तातील तिकिटांची नवी योजना जाहीर केली आहे. आधीच स्वस्तातील विमानप्रवासासाठी प्रसिद्ध असलेल्या गोएअरने आपल्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त अगदी माफक किंमतीत प्रवाशांना हवाई सफर घडवून आणण्याचे निश्चित केले आहे.
वर्धापनदिनानिमित्त गोएअरने अगदी रुपये ६११ पासून प्रवाशांना देशांतर्गत निवडक ठिकाणांसाठी तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत. फक्त त्यासाठी प्रवाशांना आजपासूनच आपल्या प्रवासाचे नियोजन करून त्याप्रमाणे आगाऊ तिकीट निश्चित करावे लागणार आहे. या सवलतीच्या दरांचा फायदा प्रवासी ११ जानेवारी ते ११ एप्रिल २०१७ या काळातील प्रवासावेळी घेऊ शकतात. त्यासाठी आजपासून येत्या मंगळवारपर्यंत प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षण करावे लागेल. आजपासूनच तिकीट आरक्षित केल्यास प्रवासी गोएअरच्या विमानांमधून आपल्या इच्छितस्थळी प्रवास करू शकणार आहेत. अर्थात ६११ रुपये ही तिकिटाची किमान किंमत आहे. यावर लागणारे विविध कर हे प्रवाशांनाच द्यावे लागतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
सवलतीच्या तिकिटांसोबतच गोएअरने आपल्या ११ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने इतरही काही बक्षिसे देण्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये प्रत्येक ११ व्या प्रवाशाला एक तिकीट मोफत देण्यात येईल. १११ व्या प्रवाशाला लेमन ट्री हॉटेलमधील वास्तव्यासाठी ४० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येईल. ११११ व्या प्रवाशाला परतीच्या प्रवाशाचे तिकीट मोफत देण्यात येईल. त्याचबरोबर दोन रात्र आणि तीन दिवसांसाठी हॉटेलमध्ये मोफत राहायला मिळेल, असे कंपनीने जाहीर केले आहे.

Story img Loader