Womens Powder Rooms in Railway Stations : लोकल ट्रेनच्या गर्दीत महिलांना नवीन साडी, ड्रेस घालून अगदी नटून-थटून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. ट्रेनमधील त्या गर्दीत काही वेळा साडी तरी खराब होते किंवा मेकअप तरी. त्यामुळे अनेक महिला ट्रेनमधील गर्दी लक्षात घेता, ऑफिसला सजून-धजून जाणे टाळतात. महिलांची हीच गैरसोय लक्षात घेत, मध्य रेल्वेने एक चांगला निर्णय घेतला आहे; ज्यामुळे महिलांना गर्दीतून प्रवास करूनही फ्रेश होऊन, टापटीपपणे ऑफिसला पोहोचता येणार आहे. कारण- महिलांना मेकअप आणि तयार होण्यासाठी मध्य रेल्वेने सात रेल्वेस्थानकांवर ‘महिला पावडर रूम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रूममध्ये महिलांना फ्रेश होत पाहिजे तसे सजता येणार आहे. इतकेच नाही, तर इथे मेकअपशी संबंधित गोष्टीही खरेदी करता येतील. त्यामुळे ही सुविधा नेमकी काय आहे ते जाणून घेऊ…
महिला प्रवाशांना मिळणार ‘या’ सुविधा
रेल्वेस्थानकावरील या पावडर रूममध्ये महिला प्रवाशांना स्वच्छतागृह, वॉश बेसिन, आरसा, टेबल या सुविधा असतील. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी महिलांना एका वेळी १० रुपये खर्च करावे लागणार आहेत. रेल्वेने यासाठी एक वार्षिक योजनाही आणली आहे. वर्षाचे ३६५ रुपये भरून महिला प्रवासी संपूर्ण वर्षभर या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
‘या’ रेल्वेस्थानकांवर सुरू होणार ‘महिला पावडर रूम’
लोकमान्य टिळक टर्मिनस, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, मानखुर्द व चेंबूर या स्थानकांवर ही सुविधा सुरू होणार आहे. लोकल ट्रेनमधून दररोज लाखो महिला प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे महिलांच्या सोईसाठी रेल्वेस्थानकावर महिला पावडर रूम सुविधा सुरू केली जात आहे. ही सुविधा अनेकदा मॉल्समध्ये दिली जाते.
महिला प्रवाशांना तयार होण्यासाठी जावे लागते मॉल्समध्ये
रेल्वेस्थानकावर पुरेशा सुविधा नसल्याने अनेकदा महिला प्रवाशांना मेकअप किंवा तयारी करण्यासाठी मॉल्समध्ये जावे लागते. मात्र, आता महिला प्रवाशांना कपडे बदलण्यासाठी आणि मेकअपसह तयार होण्यासाठी रेल्वेस्थानक परिसरातच स्वच्छ रूमची सुविधा मिळणार आहे. या रूममधील वॉशरूम वापरण्याची परवानगी फक्त महिलांनाच असे; मात्र पुरुषही तिथल्या ब्युटी स्टोअरमधून खरेदी करू शकतात; यावेळी महिला प्रवाशांबरोबर असल्यास पुरुषांना बाहेरच्या बाजूला बसण्याची सुविधा दिली जाईल.
रेल्वेच्या उत्पन्नात होईल वाढ
महिला पावडर रूमच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना केवळ चांगल्या सुविधाच देत नाही, तर यातून त्यांनी पैसे कमाईचाही उद्देश ठेवला आहे. या रूमची देखभाल व संचालनाची जबाबदारी परवानाधारक संस्थेची असेल. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, या सुविधेमुळे पाच वर्षांसाठी दरवर्षी ३९.४८ लाख रुपये याप्रमाणे कमाई अपेक्षित आहे. महिला प्रवाशांना सध्याच्या स्वच्छतागृहांसह विशेष रूमचे पर्याय असतील. प्रवासी त्यांच्या सोईनुसार याची निवड करू शकतात. यात महिलांसाठी क्लिनिंग प्रॉडक्ट्स, कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स, गिफ्ट्स आणि इतर वस्तूंची एमआरपीनुसार विक्री करण्यास परवानगी असेल. पण, तेथे खाद्यपदार्थांच्या विक्री व वितरणास परवानगी दिली जाणार नाही.