सोशल मीडियावर आपण अनेक मस्तीखोर प्राण्यांचे व्हिडीओ पाहत असतो. मात्र सध्या अमेरिकेतील, पेंसिल्वेनिया मधील एका पाळीव कुत्र्याने केलेल्या मस्तीमुळे त्याच्या मालकांना मात्र डोक्यालाच हात लावावा लागला आहे. या पाळीव कुत्र्याचे नाव सिसिल असे आहे. त्याने मजा-मस्तीमध्ये एक पाकीट पाकीट खाल्ले आहे; ज्याचा चांगलाच फटका मालकांना सहन करावा लागला.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @ooolalaw या अकाउंटने घडलेल्या सर्व प्रकारचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, बीबीसीनेदेखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांच्या माहितीनुसार, “पेंसिल्वेनियामधील, सिसिल नावाच्या एका गोल्डनडूडलने [कुत्र्याची एक प्रजाती] कंत्राटदारासाठी बाजूला काढून ठेवलेल्या ४ हजार डॉलर्सचे, म्हणजे जवळपास ३ लाख रुपये असणारे पाकीट खाऊन टाकले आहे.” असे समजते.
हेही वाचा : पाठीवर गोंडस कुत्रा अन स्केटिंग करत तरुण चढतोय घाट! सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा!
त्यांच्या अहवालानुसार, सिसिलच्या मालकांनी म्हणजेच, क्लेटन आणि कॅरी लॉ यांनी घरात थोडे डागडुजीचे काम केले होते आणि त्याचे पैसे त्यांच्या कंत्राटदाराला देण्यासाठी म्हणून एका पाकिटात भरून, स्वयंपाक घरातील ओट्यावर ठेवले होते. मात्र काही वेळानंतर त्यांना त्यांना ते पाकीट तिथे दिसले नाही. पैसे अचानक कुठे गायब झाले म्हणून त्यांनी शोधाशोध सुरु केली. जवळपास अर्ध्या तासानंतर त्यांना सिसिल त्याच पैश्याच्या पाकिटासोबत आणि केलेल्या पैश्यांच्या तुकड्यांसोबत खेळताना दिसला.
“अचानक, ‘सिसीली ४ हजार डॉलर्स [३ लाख रुपये] खात आहे’ असे मला क्लेटनने ओरडून सांगितले. हे बघून आम्ही अगदी अवाक झालो होतो.” अशी माहिती कॅरीने तेथील वृत्तपत्रांना दिली, असे बीबीसीच्या माहितीवरून समजते. “सिसिल मस्तीखोर असला तरीही तो तसा विश्वासू आहे. तुम्ही ओट्यावर कोणतेही पदार्थ ठेऊन जा; तो त्यांना अजिबात हात लावत नाही. त्याला अन्नाऐवजी पैश्यांमध्ये अधिक रस आहे असे दिसते.” अशी मिश्किल प्रतिक्रिया कॅरीने दिली आहे.
सिसिलने खाल्लेले पैसे तो स्वतःहून बाहेर काढेपर्यंत त्याच्या मालकांना वाट पहावी लागली. नंतर मिळालेले पैसे धुवून स्वच्छ करून घेतले. सर्व नोटांचे तुकडे त्याच्या सिरीयल नंबरनुसार चिकटवले जेणेकरून बँकेत जाऊन किमान त्यांना हे पैसे बदली करून मिळतील. आत्तापर्यंत त्यांनी ३५५० डॉलर्स म्हणजेच जवळपास २ लाख ९५ हजार रुपये पुन्हा मिळवले आहेत.
@ooolalaw या अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडीओला आत्तापर्यंत ११.७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावर अनेकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.
“फाटलेल्या नोटा चिकटवत बसण्यासारखे महागडे कोडे कुणालाच आवडणार नाही” असे एकाने म्हंटले आहे. “पण एवढी मोठी रक्कम स्वयंपाकघरातील ओट्यावर कोणी कसं ठेऊ शकत? केवढा तो हलगर्जीपणा.” असे दुसऱ्याने लिहिले आहे. तर शेवटी तिसऱ्याने, “बँकेत पैसे बदली करायला गेल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होत?” असे विचारले आहे.