गूगल एक फार मोठी आणि बलाढ्य कंपनी आहे. सर्चच्या क्षेत्रातली गूगलची मक्तेदारी आपल्या सर्वांना माहिती आहे. मायक्रोसाॅफ्ट सारख्या अतिबलाढ्य कंपनीला यशस्वीपणे आव्हान देत 90 च्या दशकाच्या शेवटी आणि 2000च्या दशकच्या सुरूवातीला गूगलने इंटरनेटवर जबरदस्त पकड बसवली. आॅनलाईन अॅडव्हर्टायझिंगच्या क्षेत्रात त्यांनी शोधून काढलेलं नवं तंत्र आॅनलाईन जाहिरातींसाठी क्रांतिकारी ठरलं. स्मार्टफोनच्या क्षेत्रात तर अँड्राॅईडच्या माध्यमातून जवळजवळ सगळं मार्केट गूगलच्या ताब्यात आहे.
अशा या ताकदवान गूगलला सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात सारखं सारखं तोंडावर आपटावं लागलं. आणि ही वेळ त्यांच्यावर सतत आली. त्यांनी अनेक प्रयोग केले. पण फेसबुकसोर त्या सगळ्यांनी आपटी खाल्ली. भारतात आणि जगभर सुरूवातीला प्रसिध्द ठरलेलं आॅर्कुट आधी नेस्तनाबूत झालं. त्यानंतर गूगलने बझ नावाचं सोशल नेटवर्क काढून पाहिलं. तेही आपटलं. गूगल प्लस तग धरेल असं वाटत असताना तेही निष्प्रभ ठरलं. मग गूगलने टेलिग्रॅम नावाचं मेसेंजर अॅप काढून पाहिलं. पण फेसबुकने विकत घेतलेल्या व्हाॅट्सअॅपने त्याला मागे टाकल.
आता व्हाॅट्सअॅप आणि फेसबुकला आव्हान देण्यासाठी गूगलने अॅलो नावाचं अॅप लाँच केलं. सप्टेंबर 2016 मध्ये हे अॅप लाँच होताना त्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. पण बाकी मेसेंजर्सच्या स्पर्धेत अॅलो मागे पडत असल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे.
गूगलने सध्या भारतावर लक्ष केंद्रित केलं आहे. देशभरात जवळपास 200 रेल्वे स्टेशन्सवर फ्री वायफाय उपलब्ध करून देण्यात गूगलने मोठी मदत केली आहे. अॅलो लाँच करतानाही गूगलने भारतीय यूझर्सना नजरेसमोर ठेवत हे अॅप लाँच केलं होतं. पण त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाहीये.
सर्चमध्ये दादा कंपनी असणारी गूगल सोशल नेटवर्किंगमध्ये मात्र गेली 10 वर्षं मार खातेय. या क्षेत्रात फेसबुक ने आपला दबदबा कायम ठेवला आहे.