२२ एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून ओळखला जातो. याचे औचित्य साधून गुगलने अॅनिमेटेड डुडल सादर केले आहे. अॅनिमेटेड डुडलमधून संदेश देत गुगलने जागतिक वसुंधरा दिन दिन साजरा केला आहे. या डुडलमध्ये पृथ्वीवरील आश्चर्य म्हणता येतील असे जीव, झाडांची माहिती देण्यात आली आहे. आपण राहतो तो ग्रह किती अद्भूत आहे, हे दाखवण्याचा हा गुगलचा प्रयत्न आहे.
सोमवारी गुगल डुडलवर पृथ्वीवरील असणाऱ्या वेगळे जीव आणि वृक्षांना दाखवले आहे. या अॅनिमेडेट डुडलद्वारे गुगलने पृथ्वीचे अद्भुत दर्शन घडवले आहे. गुगलवर क्लिक केल्यानंतर एक व्हिडीओ सुरू होतो.
पहिल्या स्लाइडमध्ये वॉन्डरिंग अॅल्बट्रॉस पक्षी दाखवण्यात आला आहे. वॉन्डरिंग अॅल्बट्रॉसला सर्वात मोठे पंख असणारा पक्षी म्हणून ओळखलं जाते. दुसऱ्या स्लाइडमध्ये पृथ्वीवरील सर्वात मोठा वृक्ष कोस्टल रेडवूडला दाखवण्यात आले आहे. तिसऱ्या स्लाइडमध्ये सर्वात लहान बेडूक Paedophryne Amauensis दाखवण्यात आला आहे. चौथ्या स्लाइडमध्ये अॅमेझॉन वॉटर लिलीला दाखवण्यात आले आहे. अॅमेझॉन वॉटर लिलीला पाण्यातील सर्वात मोठा वृक्ष मानले जाते.
१९७० पासून २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून जगभरातील १९३ देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक देशामध्ये काही वार्षिक कार्यक्रम, चर्चासत्रं आयोजित केली जातात. महाराष्ट्रात दुष्काळाची समस्या वर्षांनुवर्षे अधिक बिकट होत चालली आहे. संपूर्ण जगभरात पिण्याच्या पाण्याची समस्या वाढते आहे.