Google Celebrats Madhubala birthday with doodle : आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना मोहवणारी दिवंगत हिंदी चित्रपट अभिनेत्री मधुबालाची आज जयंती आहे. मधुबाला अर्थात मुमताझ जहन नेहलवीच्या कर्तुत्वाला गुगलने डुडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. गुगलने मधुबाला यांच्या गाजलेल्या ‘मुघल ए आझम’ या चित्रपटामधील गाण्यातील नृत्य करीत असलेले खास डुडल केले आहे. १४ फेब्रुवारी १९३३ रोजी जन्मलेली मधुबाला २३ फेब्रुवारी १९६९ रोजी वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी हे जग सोडून गेली. वयाच्या ९ व्या वर्षी हिंदी चित्रपटात वसंत म्हणून अवतरलेलं हे बालकलाकार रूपातील लावण्य पुढे नायिका म्हणून ज्वाला रूपात समाप्त झालं. अवघ्या २५ वर्षांच्या कारकीर्दीत ७१ चित्रपटात काम केले.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे बालवयात चित्रपटात भूमिका करून घर सांभाळणारी मुमताज पुढे मधुबाला या नावाने हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्री बनली आणि मृत्यूनंतर एक दंतकथा बनली. ‘महल’, ‘तराना’, ‘मिस्टर अॅण्ड मिसेस 55’, ‘चलती का नाम गाडी’, ‘मुघल-ए-आझम’, ‘बरसात की रात’, ‘बसंत’, ‘निराला’, ‘अमर’, ‘ढाके की मलमल’, ‘कालापानी’, ‘हावडा ब्रिज’, ‘हाफ टिकट’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट. ‘ज्वाला’ हा तिचा अखेरचा चित्रपट तिच्या मृत्यूनंतर १९७१ साली प्रदíशत झाला. मधुबालाने तत्कालीन बहुतेक सर्व प्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर नायिकेचे काम केले पण त्यापकी दिलीपकुमार आणि देव आनंद यांच्याबरोबर ती प्रेक्षकांना अधिक भावली.
मधुबालाच्या यशस्वी चित्रपट कारकीर्दीला ग्रहण लागले तिच्या आजारपणाचे. १९५४ पासून तिला मधूनमधून रक्ताच्या उलटय़ा होऊन दम लागायला लागला. १९६१ मध्ये तिच्या आजारपणाचे निदान झाले व्हेन्ट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट, म्हणजे हृदयाला छिद्र असणे. खंगत जाऊन अखेरीस २३ फेब्रुवारी १९६९ रोजी मुंबईत या गुणी अभिनेत्रीचे निधन झाले.